बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस

जन्म. १६ जून १९५० कोलकत्ता येथे

गौरांग चक्रवर्ती हे खरे नाव असलेल्या चक्रवर्ती यांनी त्यांनी कोलकत्ता मधील विख्यात स्कॉटिश चर्च कॉलेज मधून बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून अभिनयाचे शिक्षण घेतले. करिअरच्या सुरूवातीला ऍक्शन आणि डान्ससाठी मिथुन चक्रवर्ती यांची खास ओळख निर्माण झाली होती. ‘गरिबांचा अमिताभ’ म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात १९७६ साली मृगया चित्रपटाने केली. मृगया या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांनी खऱ्या अर्थाने डान्सिंग स्टार बनवले. ८० च्या दशकात डिस्को डान्स हा नृत्य प्रकार त्यांनीच लोकप्रिय केला. आपल्या आगळ्या-वेगळ्या डान्स शैलीमुळे ते आजही लोकप्रिय आहेत. सुरक्षा, तराना, हम पांच, शौकीन, वारदात, डिस्को डान्सर, प्यार झुकता नही, डान्स-डान्स यांसारख्या चित्रपटात त्यांनी प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे. ‘अविनाश’, ‘जाल’, ‘भ्रष्टाचार’, ‘घर एक मंदिर’, ‘वतन के रखवाले’, ‘चरणों की सौगंध’, ‘हमसे है जमाना’, ‘बॉक्सर’, ‘बाजी’, ‘कसम पैदा करने वाले की’, ‘प्यार झुकता नहीं’ हे त्यांचे इतर चित्रपट होत. १९९० मध्ये आलेल्या ‘अग्नि पथ’ चित्रपटातील दक्षिणात्य व्यक्तीची त्यांची भूमिका आजही कौतुकास्पद वाटते. मिथुन चक्रवर्ती यांचा १९९५ मध्ये आलेला ‘जल्लाद’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने त्यांनी लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान बनवले. मिथुन यांच्यासाठी सर्वाधिक कठीण काळ हा १९९३ ते १९९८ हा होता. या काळात रिलीज झालेले त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. आतापर्यंत त्यांचे ३३ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. आजही मिथुन चक्रवर्ती नृत्याला आपलं पहिलं प्रेम मानतात. अभिनयापासून दूर असलेले मिथुन चक्रवर्ती लाइमलाइटमध्ये फारसे दिसत नाहीत.
२००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘गुरू’ चित्रपटातील एडिटरची भूमिकाही देखील उल्लेखनीय होती.

मिथुन चक्रवर्ती यांनी वीर, गोलमाल ३, हाऊसफुल २, ओह माय गॉड, खिलाडी ७८६, कांची, किक आणि हवाईजादा यांसारख्या चित्रपट केले आहेत. २०१९ मध्ये मिथुन यांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘ताश्कंद फाइल्स’ चित्रपटात अभिनय केला होता. त्यांच्याच ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटातही मिथुन यांची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट २०२० मध्येच प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं.
मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदीत ३५० हून अधिक चित्रपटात व बंगाली,उडीया व भोजपुरी चित्रपटात अभिनय केला आहे. मिथुन चक्रवर्ती यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन फिल्म फेयर पुरस्कार, दोन स्टारडस्ट पुरस्कार आणि एक स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाले आहे. मोठय़ा पडद्याप्रमाणेच छोटय़ा पडद्यावरील डान्स शो डान्स इंडिया डान्समध्ये ते ग्रँडमास्टर रूपाने लोकांपुढे आले. मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदीसह बंगाली, उडिया आणि भोजपूरी चित्रपटात काम केले. केवळ चित्रपट अभिनेता म्हणून नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक आणि राज्यसभा सदस्य अशी मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आहे. अभिनेता असण्यासोबतच मिथुन चक्रवर्ती एक यशस्वी उद्योजक सुद्धा आहेत. मिथुन चक्रवर्ती ‘मोनार्क ग्रुप’ मालक आहेत. हा ग्रुप हॉस्पिटालिटी सेक्टर मध्ये काम करतो. मिथुन चक्रवर्ती यांचा लक्झरी हॉटेलचा व्यवसाय आहे.
मिथुन चक्रवर्ती कधीकाळी डाव्यांच्या जवळचे मानले जायचे. त्यानंतर काहीकाळ ते ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस सोबतही होते. ते तृणमूल काँग्रेसचे राज्य सभा खासदार होते. चिटफंड घोटाळ्यामध्ये नाव आल्यानंतर २०१६ च्या शेवटी मिथुन यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजकारणातूनही संन्यास घेतला होता पण या वर्षी म्हणजे मार्च २०२१ मध्ये मिथुन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
१९८२ साली त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते. मिथुन यांना तीन मुले एक मुलगी आहेत. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव, मिमो चक्रवर्ती; ज्यांनी २००८मध्ये आलेल्या ‘जिमी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या फ्लॉपनंतर त्याने आपले नाव बदलून महाक्षय केले. जिमीनंतर त्याने ‘द मर्डरर’, ‘हॉन्टेड 3D’,’लूट’,’एनिमी’, ‘इश्केदारियां’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे दूसरे चिरंजीव, रिमो चक्रवर्ती हा २००८ साली आलेल्या ‘फिर कभी’ या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती यांची तरुण पणाची भूमिका करताना दिसला होता. त्यानेही आपले नाव बदलून उश्मेय चक्रवर्ती असे ठेवले आहे. धाकटा मुलगा नमाशी आणि मुलगी दिशानी दोघेही सध्या शिक्षण घेत आहेत. २०१३ मध्ये दिशानी आपले वडील मिथुन चक्रवर्ती समवेत डान्स इंडिया डान्सच्या सेटवर दिसली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.