देशातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाइन नामांकन किंवा शिफारस सादर करण्याची 15 सप्टेंबर 2022 ही शेवटची तारीख आहे. आता दाखल केलेल्या नामांकनासाठी पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनावेळी पुरस्कार जाहीर करण्यात येईल. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन किंवा शिफारस करण्याची प्रक्रिया 1 मे पासून सुरू झाली आहे आणि 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. या वेळी नामांकन किंवा शिफारस ऑनलाइनच सादर केली जाईल, असं गृह मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून म्हटलं आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.
पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण , पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश होतो. हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. 1954 पासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांची घोषणा केली जाते. कला , साहित्य, शिक्षण, क्रीडा , मेडिसीन, सामाजिक कार्य, विज्ञान यासह अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय आणि विशेष कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्कार दिले जातात.
केंद्र सरकारने या वर्षी 128 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यापैकी 4 व्यक्तींना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. तर, या पद्म पुरस्कारांचा इतिहास काय आहे? नामांकन किंवा शिफारसी करण्याची प्रक्रिया काय आहे? पद्म पुरस्काराने सन्मानित झाल्यास काय मिळते? याबद्दल जाणून घेऊयात.
पद्म पुरस्कारांचा इतिहास
padmaawards.gov.in या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार 1954 पासून भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार देत आहे. पूर्वी पद्मविभूषणमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी असे तीन वर्ग होते. पण नंतर या वर्गांची नावे नंतर बदलण्यात आली. 8 जानेवारी 1955 रोजी केंद्र सरकारने एक अधिसूचना प्रसिद्ध करत त्या वर्गांची नावे बदलून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री केल्याचं जाहीर केलं होतं.
पद्म पुरस्कार कोणाला मिळतात?
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, समाज कार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसह विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी किंवा सेवांसाठी हे पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात.
1. पद्मविभूषण: असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी.
2. पद्मभूषण: उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी.
3. पद्मश्री: विशिष्ट सेवेसाठी.
गृह मंत्रालयाच्या मते, कोणतीही व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहे. मात्र, सरकारी कर्मचारी पदावर असेपर्यंत या पुरस्कारांसाठी पात्र नसतात. मात्र, डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना यातून सूट देण्यात आली आहे.
पद्म पुरस्कारांसाठी निवड कशी केली जाते?
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची सरकारं, केंद्र सरकारची मंत्रालयं किंवा विभाग, भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पद्म पुरस्कारांसाठी कोणत्याही व्यक्तीच्या नावाची शिफारस करू शकतात. ही प्रक्रिया दरवर्षी होत असते. याशिवाय एखादी व्यक्ती पद्म पुरस्कारासाठी स्वतःचे नामांकनदेखील करू शकते. यासाठी Awards.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. इथे तुम्हाला Nomination/Apply Now या टॅबवर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागेल. तसंच, तुम्ही केलेल्या कामाची माहिती द्यावी लागेल. कामाची माहिती देताना त्याची शब्द मर्यादा 800 पेक्षा जास्त नसावी. नामांकन किंवा शिफारसी करण्यासाठीदेखील वेळेची एक मर्यादा आहे. दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर ही तारीख निश्चित असते. याच तारखेदरम्यान नामांकन दाखल करता येतं. तसंच 15 सप्टेंबर ही नाव मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
दरवर्षी पंतप्रधान पद्म पुरस्कारांच्या नावांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करतात. या समितीचे अध्यक्ष कॅबिनेट सचिव असतात. नामांकन आणि शिफारसी आलेल्या नावांचा विचार केल्यानंतर या समित्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना शिफारस करतात. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर पद्म पुरस्कारासाठी नावं निश्चित केली जातात.
एका वर्षात देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची संख्या 120 पेक्षा जास्त नसावी, असा नियम आहे. पण यात मरणोत्तर पुरस्कार आणि परदेशी व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा समावेश असेल तर ही संख्या 120 च्या पुढे जाऊ शकते. महत्वाचं म्हणजे पद्म पुरस्कार सहसा मरणोत्तर दिले जात नाहीत. परंतु, काही प्रकरणांमध्ये, सरकार मरणोत्तर पुरस्कार देण्याचा विचार करू शकते.
पद्म पुरस्कार विजेत्यांना काय मिळते?
– दरवर्षी राष्ट्रपती भवनात या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जातं. यादरम्यान, पद्म पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि शिक्का असलेलं प्रमाणपत्र आणि पदक दिलं जातं.
– पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या पदकाची एक प्रतिकृतीदेखील दिली जाते, जी ते कोणत्याही कार्यक्रमात वापरू शकतात.
– गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा पुरस्कार कोणतीही पदवी नाही. त्यामुळे विजेत्यांच्या नावापुढे किंवा मागे ते वापरले जाऊ शकत नाहीत. कोणीही असं केल्यास पुरस्कार परत घेतला
जाऊ शकतो.
– या पुरस्कारासह, विजेत्यांना कोणतंही रोख बक्षीस, भत्ता किंवा रेल्वे व विमान प्रवासात सवलत यांसारखी कोणतीही सुविधा दिली जात नाही.
पद्म पुरस्कार कधी जाहीर होतात?
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. मात्र, 1978, 1979 आणि 1993 ते 1997 या काळात काही कारणांमुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांच्या घोषणा झाल्या नव्हत्या.
असा आहे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांचा इतिहास, नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया आणि पुरस्कारांचं स्वरुप. तुमच्या ओळखीत कुणी किंवा तुम्ही स्वतः या पुरस्कारासाठी पात्र असाल आणि एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असेल, तर तुम्हीही या पुरस्कारांसाठी नामांकन दाखल करू शकता.