टोमॅटो लागवडीत घट झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर तेजीत आहेत. पुणे, मुंबईतील किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर ८० ते १०० रुपये असून आवक सुरळीत न झाल्यास येत्या काही दिवसांत ते शंभरीपार जाण्याची शक्यता आहे.
टोमॅटोची लागवड पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर आणि सोलापूर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर केली जाते; परंतु उन्हाळय़ामुळे टोमॅटोची लागवड कमी झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत.
केटरींग व्यावसायिक तसेच हॉटेलचालकांकडून टोमॅटोला चांगली मागणी आहे. बाजारात टोमॅटोची आवक कमी होत असल्याने गेल्या १५ दिवसांत टोमॅटोच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. सध्या किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोची विक्री प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपये किलो दराने केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी उत्पादन कमी झाल्याने टोमॅटोने शंभरी पार केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली. मात्र, अपेक्षित दर मिळाले नाहीत. आवक वाढल्याने पाच ते दहा रुपये दर मिळाला होता. त्यामुळे उद्विग्न शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतात फेकून दिले होते. यंदा शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. परिणामी, आवक होत नसल्याने दरात वाढ झाली आहे.