आज दि.१७ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

जुलै महिन्यात सीरम मुलांवर Novavax
लशीची चाचणी घेऊ शकते

पुण्यातील देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सीरम संस्था मुलांवर Novavax लशीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जुलै महिन्यात सीरम संस्था मुलांवर Novavax लशीची चाचणी घेऊ शकते. सीरम संस्था सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनी Novavax कोरोना लस देशात येण्याची अपेक्षा करत आहे.

CBSE बोर्डाच्या बारावी परीक्षेचा
निकाल ३१ जुलै रोजी लागणार

इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल २० जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा CBSE बोर्डाने केली आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार आहे. आजच CBSE ने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र जाहीर केले आहे. या सूत्रानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

खाल्लेल्या ताटात थुंकणे
हीच शिवसेनेची सवय

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केले असून सत्तेत असताना गुलामासारखी वागणूक दिली असल्याचं म्हटलं आहे. तसंच भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाल्याचंही ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या या टीकेवर भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच शिवसेनेची सवय असल्याची टीका केली आहे.

कुंभमेळा चाचणीच्या घोटाळ्याशी
आपला संबंध नाही

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या कुंभमेळ्यामधील करोना चाचण्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. एका बनावट कंपनीला कुंभमेळ्यामधील करोना चाचण्यांचं कंत्राट देण्यात आल्याचं उघड झाल्याने कुंभमेळा आयोजनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. करोना चाचणीच्या चौकशीच्या घोटाळ्याबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वीची ही घटना असल्याचे विधान केले आहे.

३ दिवसांत गौतम अदानी यांची संपत्ती
७० हजार कोटी रुपयांनी घसरली

गौतम अदानी यांना एकामागे एक आश्चर्याचे धक्के बसत आहे. अदानी यांनी आशियातील श्रीमंतांच्या यादीत घसरण झाली आहे. आता आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्तीचा स्थानावरुन ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. शेअर बाजारामध्ये गौतम अदानींच्या कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे त्यांची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या ३ दिवसांत गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ७० हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा
प्रयत्न करणे यात चुकीचे काय

स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल. त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे असा सूचक इशारा शिवसेनेने दिला आहे.

तोपर्यंत गोव्यात पर्यटन
पुन्हा सुरू होणार नाही

राज्यातील प्रत्येक १८ वर्षावरील व्यक्तीला करोनावरील लसीचा कमीतकमी एक डोस मिळत नाही तोपर्यंत गोव्यात पर्यटन पुन्हा सुरू होणार नाहीत, असे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लहान मुलींची हत्या करणाऱ्या
वडिलांना जाहीर मृत्यूदंडाची शिक्षा

येमेनची राजधानी सनामध्ये इराण पुरस्कृत हूती विद्रोह्यांनी लहान मुलींची हत्या करणाऱ्या वडिलांना भर चौकात जाहीर मृत्यूदंडाची शिक्षा दिलीय. राजधानी सनावर ताबा मिळवलेल्या या विद्रोह्यांनी तीन आरोपींना भर चौकात गोळ्या घालून ठार केल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. आरोपींचा मृत्यू झाल्यानंतर एका चादरीत गुंडाळून त्यांचे मृतदेह चौकामधून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले. ही मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असताना सुरक्षा दलातील जवान जमीनीवर पडलेल्या या आरोपींवर हसत होते.

इस्रायलच्या सैन्यात मुळ
गुजरातच्या दोन बहीणी

काही दिवसांपूर्वी पॅलेस्टाईन-इस्रायल मधील युद्ध हा जगभरात चर्चेचा विषय होता. ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या अनेक भागांवर इस्रायली सैन्याने बॉम्बस्फोट केले. इस्त्रायली सैन्य जगातील सर्वात धोकादायक सेना मानली जाते. या इस्रायलच्या सैन्यात मुळ गुजरातच्या असलेल्या दोन बहीणी आहेत. ज्या इस्रायलच्या सैन्यात सेवा करतात. कमी वयात त्या सैन्यात भरती झाल्या.

अभिनेता सोनू सूद
अडचणीत येण्याची शक्यता

अभिनेता सोनू सूद आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण कोरोनावरील औषधं पुरवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं सोनू सूद आणि झिशान सिद्दीकी यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीचे निर्देश देताना कोर्टानं अभिनेता सोनू सूदवर ताशेरे ओढलेत. हे लोक लोकांना मदत करताना स्वत:ला मसिहा भासवतात असं न्यायमूर्ती म्हणाले.

तराफावरील १६ खलाशांची
सुखरूप सुटका

रेवंदडा बंदरातून निघालेला एमव्ही मंगलम हा मालवाहू तराफा (बार्ज) गुरुवारी पहाटे रेवदंडा खाडीत बुडला. तटरक्षक दलाने मदत व बचावकार्य मोहीम राबवून या तराफावरील १६ खलाशांची सुखरूप सुटका केली.
हा मालवाहू तराफा रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास बंदरापासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर तो कलंडण्यास सुरवात झाली.

रत्नागिरी सिंधुदुर्गात
पावसामुळे नद्यांना पूर

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेले चार दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. या कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी पुराचे पाणी वस्ती आणि शेतीत घुसले आहे. तर अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. तर सिंधुदुर्गात कणकवली येथील गड नदीला पूर आला आहे. रत्नागिरीतील गुहागरमध्येही पालशेत पुलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

इंदूरमध्ये हिरव्या
बुरशीचा रुग्ण आढळला

काळी बुरशी, पांढरी बुरशी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हिरव्या बुरशीचा एक रुग्ण आढळला आहे. 33 वर्षीय रूग्णाच्या फुफ्फुसांची तपासणी केली असता देशात हिरव्या बुरशीचे हे पहिलेच प्रकरण आढळले आहे. रुग्णास मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी अपूर्व तिवारी यांनी सांगितले की, रुग्णाच्या फुफ्फुसांच्या तपासणीत हिरव्या रंगाची बुरशी आढळली. रंगाच्या आधारे त्याला नाव देण्यात आले.

बीएचआर घोटाळाप्रकरणी
जळगाव मध्ये सात जणांना अटक

बीएचआर घोटाळा मागील काही दिवसापासून संपूर्ण राज्यात गाजत आहे. पुण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपींचे जामीन होत असतानाच दुसरीकडे आज पहाटे मात्र, जळगाव जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटकसत्र राबविले. यात भागवत भंगाळे (जळगाव) छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील जामनेर यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर) अशा अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.