पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँकेच्या 13,500 कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. विशेष म्हणजे मेहुल चोक्सी हा संबंधित घोटाळा उघड झाल्यानंतर देशाबाहेर पळून गेला आहे. त्याने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी प्राप्तीकरण विभागाने त्याच्याविरोधात मोठी कारवाई करत त्याची नाशिकमधील 100 एकर जमीन जप्त केली होती. त्यानंतर मेहुल चोक्सी याच्याबद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कॅनरा बँक आणि महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने मेहुल चोक्सी विरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सीने कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांची 55.27 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सीबीआयने याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय याप्रकरणी चौकशी करत आहे.