नागपूर शहराच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशीच येथील एका महिलेनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. दिवाळीची खरेदी झाल्यानंतर मृत महिलेनं घरात नवीन डायनिंग टेबल घेण्याची मागणी आपल्या पतीकडे केली होती. पण पैसे नसल्याने पतीने पत्नीच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. घरात नवीन डायनिंग टेबल न घेतल्याने संबंधित महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. पतीच्या फिर्यादीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संगीता राजन पाटील असं आत्महत्या करणाऱ्या 42 वर्षीय महिलेचं नाव असून त्या हुडकेश्वरमधील बेसा परिसरातील टेक ऑफ सिटीच्या सी विंगमधील रहिवासी होत्या. मृत संगीता ह्या गृहिणी असून त्यांचे पती राजन पाटील हे खाजगी नोकरी करतात. दिवाळी सणाची खरेदी झाल्यानंतर संगीता यांनी आपल्या पतीकडे डायनिंग टेबलची मागणी केली होती. शनिवारी भाऊबीजेच्या दिवशी सकाळपासूनच त्यांनी आपल्या पतीकडे डायनिंग टेबलसाठी हट्ट धरला होता.
पण दिवाळीची खरेदी करण्यात बराच पैसा खर्च झाल्याने डायनिंग टेबल आपण पुढच्या वेळी घेऊ, असं पती राजन यांनी आपल्या पत्नीला सांगितलं. पण हट्टाला पेटलेल्या पत्नीने राजन यांचं ऐकलं नाही, त्यांनी घरात नवीन डायनिंग टेबल आणावा, यासाठी बरीच आदळआपट केली. पण राजन यांच्याकडे पैसे नसल्याने ते आपल्या पत्नीचा हट्ट पुरवू शकले नाहीत.