कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले.
राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य शासनाने दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेले आर्थिक साहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
कोरोना विषाणूचे उत्परिवर्तन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संक्रमित झाली आहे. प्राणवायू उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ज्ञ कृती दलाकडून समजून घ्यावे. प्राणवायूचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. सूक्ष्म आणि लहान प्रतिबंधित क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा, त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. विवाह समारंभ हे करोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असे ठाकरे यांनी सांगितले.
रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगताना प्राणवायू सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा अशी सूचना राज्याच्या कृती दलाचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी के ली. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले.