भारत व पाकिस्तान यांच्यात सरधोपट युद्ध होण्याची शक्यता नसली, तरी दोन्ही देशांमधील संकटे अधिक तीव्र झाल्याने ती चिघळण्याचे चक्र सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (ओडीएन) कार्यालयाने अमेरिकी काँग्रेसला सादर केलेल्या ‘थ्रेट अॅसेसमेंट रिपोर्ट’मध्ये नमूद केले आहे.
‘काश्मीरमधील हिंसक असंतोष किंवा भारतात घडवून आणलेला दहशतवादी हल्ला हे तणावाचे संभाव्य मुद्दे असून, वाढलेल्या तणावामुळे या दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये संघर्ष उद्भवण्याचा धोका वाढला आहे’, असेही या अहवालात म्हटले आहे. भारताने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू व काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध रसातळाला गेलेअसून, तेव्हापासून दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजधानीत उच्चायुक्त नेमलेले नाहीत.