इजिप्तने भारताला गव्हाचा प्रमुख पुरवठादार स्रोत म्हणून निवडले असून २०२२-२३ मध्ये भारतातून तीन दशलक्ष टन गहू इजिप्तला निर्यात होणार आहे. गव्हासाठी प्रामुख्याने रशिया आणि युक्रेनवर अवलंबून असलेल्या इजिप्तने युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातून गहू आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय गव्हाची मोठय़ा प्रमाणात निर्यात होणार आहे.
इजिप्तने २०२१मध्ये ६.१ दशलक्ष टन गहू आयात केला, मात्र इजिप्तच्या गहू निर्यातीच्या मान्यताप्राप्त देशांच्या यादीत भारताचा समावेश नव्हता. त्यावर्षी इजिप्तने आयात केलेल्या गव्हापैकी ८० टक्क्यांहून जास्त गहू रशिया आणि युक्रेनमधून आयात केला होता.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर त्या देशांकडून होणारा गहूपुरवठा विस्कळीत झाल्याने इजिप्त पर्यायी स्रोतांकडून धान्य मिळवण्याच्या शक्यतांचा शोध घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून इजिप्तच्या शिष्टमंडळाने भारताला भेट दिली. इजिप्तमधील कृषी विलगीकरण आणि कीटक जोखीम विश्लेषण (क्वारंटाईन अॅण्ड पेस्ट रिस्क अॅनालिसिस) अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील प्रक्रिया केंद्रे, बंदर सुविधा आणि गव्हाच्या शेतांना भेट दिली. त्यानंतर भारताचा गहू निर्यातदार देशांमध्ये समावेश केला.
परकीय व्यापार महासंचालनालयाच्या अंदाजानुसार २०२०-२१ मध्ये भारताने विक्रमी सात दशलक्ष टन गव्हाची निर्यात केली. त्याचे बाजारमूल्य तब्बल २.०५ अब्ज डॉलर एवढे आहे. मागील आर्थिक वर्षांत सुमारे ५० टक्के गहू बांगलादेशात निर्यात करण्यात आला. येत्या काळात बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, कतार, श्रीलंका, ओमान आणि मलेशिया यांच्या मागणीमुळे निर्यातीत वाढ होईल. येमेन, अफगाणिस्तान आणि इंडोनेशियासह इतर देशांमध्ये गहू निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) यांच्यातर्फे देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांत गहू निर्यात वाढीसाठी कृषी, रेल्वे, शिपिंग, निर्यातदार आणि राज्य शासनाबरोबर काम करत असल्याचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी नुकतेच जाहीर केले आहे.
इजिप्तला २०२२-२३ मध्ये तीन दशलक्ष टन गहू निर्यात करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी दिली आहे. रशिया युक्रेन संघर्षांमुळे जागतिक स्तरावर धान्याची मागणी वाढत असून भारताने १० दशलक्ष टन गहू निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच भारतातून गव्हाची निर्यात वाढवण्याच्या संधींच्या विस्तारासाठी मोरोक्को, टय़ुनिशिया, इंडोनेशिया, फिलिपीन्स, व्हिएतनाम, तुर्की, अल्जेरिया आणि लेबनॉन येथे व्यापारी शिष्टमंडळे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.