महाराष्ट्र विधीमंडळात राज्यसभा मतदानाच्या वेळी भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “मी नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली. मतदानाच्यावेळी मी माझ्या पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवलं. ते दाखवलं नसतं तर माझ्या पक्षाकडून ६ वर्षांसाठी निलंबन होऊन माझं राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. ते विधीमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्या मतावर आक्षेपाच्या बातम्या आल्या म्हणून मी भूमिका मांडत आहे. मी मतदान केल्यानंतर माझ्या पक्षाच्या प्रतिनिधींना मतदान दाखवले. ही प्रक्रिया आहे. मी तेथे हसलो त्याला वेगळ कारण होतं. मी मतपत्रिका बंद केली आणि पत्रिका टाकून बाहेर निघून गेलो. गेटवर जाईपर्यंत आक्षेप घेण्यात आला नव्हता. त्यानंतर आक्षेप घेण्यात आला.”
मतदानात जी कृती केलीय त्यात मत बाद व्हावं असं काहीही झालेलं नाही. महाराष्ट्रासमोर आम्ही चुका केल्या असं जाऊ नये. सध्या काय घडतंय हे महाराष्ट्राला कळत आहे. जे काय सुरू आहे ते वेदनादायक आहे. आम्हीही २०-२५ वर्षांपासून आमदार आहोत. उगाच रडीचा डाव खेळला जात आहे,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “नियमाप्रमाणे मी ज्या व्यक्तीला माझं मत दाखवायला हवं त्या माझ्या पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवलं. ते मत मी त्यांना दाखवलं नाही, तर मला माझा पक्ष ६ वर्षांसाठी निलंबित करू शकतो आणि माझं राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं.”