अफगाणिस्तानात पाकिस्तानचा डबल गेम आता जगाच्या लक्षात आला आहे. ज्या अमेरिकेने तालिबानला खदाडण्यासाठी पाकिस्तानची मदत घेतली, तोच पाकिस्तान तालिबानला मजबूत करण्यात आणि अमेरिकेला धोका देण्यात पुढं होता. हक्कानी नेटवर्कच्या माध्यमातून पाकिस्तानने अफगाणिस्तानात आपले मनसूबे पूर्ण केले. यामुळेच आता अमेरिकेने पाकिस्तान संबंधावर विचार करण्यास सुरुवात केली आहे. बायडन प्रशासनाकडून पाकिस्तान संबंधावर पुन्हा विचार करणं सुरु आहे. बायडन प्रशासन सध्या तालिबानपेक्षाही पाकिस्तानवर सर्वाधिक नाराज आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी ही माहिती दिली आहे.
अमेरिकी संसदेत चर्चेदरम्यान, ब्लिंकन यांनी उघडपणे सांगितलं की, पाकिस्तानने दोन्ही बाजूने खेळ खेळला. जगाची त्याने फसवणूक केली. हेच पाहता अमेरिका आता पाकिस्तानशी संबंध कसे ठेवायचे यावर परत विचार करत आहे. हेच नाही तर पाकिस्तानशी यापुढे कसं वागायचं हेही निश्चित केलं जाईल हेही ब्लिंकन यांनी सांगितलं. अमेरिकी खासदारांनी पाकिस्तानबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आणि कडक पावलं उचलण्याची मागणी केली. अफगाणिस्तानातील पाकिस्तानचा डबल गेम जगाच्या लक्षात आला आहे. पाकिस्तानने दिलेल्या धोक्याबद्दल आता अमेरिकेत प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. सामान्य अमेरिकन लोकही पाकिस्तानवर नाराज असल्याचं दिसतं आहे. हेच पाहता आता अमेरिका पाकिस्तानवर कडक पावलं उचलू शकतं.
अमेरिकेने यापुढे पाकिस्तानला एकही पैसा देऊ नये अशी मागणी अमेरिकन संसदेत करण्यात आली आहे. अमेरिकेने ज्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं, त्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानने पोसलं. तालिबानच्या सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कला वाटा मिळावा यासाठी पाकिस्तानने लॉबिंग केलं. हेच पाहता पाकिस्तानला यापुढे काहीच मदत करु नये अशी थेट भूमिका अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आली. ब्लिंकन म्हणाले की, यापुढे जर पाकिस्तानला कसलीही मदत हवी असेल, तर पााकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील.
तालिबानशी पाकिस्तान सध्या जास्त जवळीक करताना दिसतो आहे. अंतरिम सरकार स्थापन करण्यातही पाकिस्तानने लॉबिंग केलं आहे. हेच पाहता, तालिबानशी दोस्ती केली तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेच्या संसदेत खासदारांनी दिला. तालिबानी सरकारला इतक्या लवकर मान्यता देण्याची घाई पाकिस्तानने करु नये. नाहीतर त्याचे अमेरिका-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील असंही अमेरिकेन सिनेट सदस्यांनी सांगितलं आहे.