सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं आहे. मुलांना राहायला हॉस्टेल नाही, तसंच कुलगुरू भेटत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हॉस्टेल नंबर 8 ला बायोमेट्रिक बंधनकारक केल्यामुळे पॅरासाईट विद्यार्थ्यांना हॉस्टेल प्रवेश बंद झाला आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी गेटवरच हे आंदोलन सुरू केलं आहे. विद्यार्थ्यांनी गेट बंद करून रस्ता अडवला.
पॅरासाईट म्हणजे काय?
पुणे विद्यापीठात बरेच विद्यार्थी पॅरासाईट म्हणून राहतात. पॅरासाईट म्हणजे एका रुममध्ये ऍडमिशन झालेले दोन विद्यार्थी राहत असतील, तर तिकडेच त्यांचे दोन गेस्ट म्हणून विद्यार्थी राहतात. हे विद्यार्थी प्रामुख्याने एमपीएससी किंवा दुसऱ्या कोर्सचे असतात. हॉस्टेलला ऍडमिशन मिळत नाही म्हणून ते हॉस्टेलमध्ये राहतात.
विद्यापीठाने बायोमेट्रिक कम्पलसरी केल्यामुळे 60-70 विद्यार्थी रस्त्यावर आले. हॉस्टेलमध्ये प्रवेशबंदी केल्यामुळे या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. हॉस्टेल मुलांसाठी आहे मग तुम्ही आम्हाला प्रवेशबंदी का करता? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे.
आम्ही विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत, गरज म्हणून आम्ही हॉस्टेलमध्ये राहत आहोत. आम्हाला हॉस्टेलसाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.