अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी गेल्या शुक्रवारी (९ डिसेंबर) झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने सोमवारी प्रसिद्ध केले. २० जवान शहीद झालेल्या अडीच वर्षांपूर्वीच्या गलवान संघर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे.
‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलातील अधिकाऱ्याने दुजोरा दिला असला तरी त्याबाबतचा तपशील देण्यास मात्र त्याने नकार दिला. चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाले आहेत, असा दावा या अधिकाऱ्याने केला. चकमकीत काही भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. भारतीय जवानांची ६०० चिनी सैनिकांशी चकमक झाली, असे सूत्रांनी सांगितले.
लडाखमधील गलवान खोऱ्यात अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतरची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद, तर अनेक जखमी झाले होते. अरुणाचल सीमेवर चिनी सैनिकांशी झालेल्या कथित चकमकीच्या घटनेला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे, मात्र तपशील देण्यास वा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. या संदर्भात लष्कराला प्रश्नावलीही पाठवण्यात आली होती, मात्र लष्कराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे वृत्तात म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेश सीमेवर चिनी सैनिकांशी संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सीमा निश्चित नसल्याने या भागात गस्त घालताना अनेकदा भारतीय जवान आणि चिनी सैनिक समोरासमोर येतात. अशीच एक घटना २०२१च्या ऑक्टोबरमध्ये घडली होती. चीनच्या मोठय़ा गस्ती पथकातील काही सैनिकांना भारतीय जवानांनी ताब्यात घेतले होते. तेव्हा त्यांच्यात यांगत्सेजवळ किरकोळ चकमक झाली होती.
गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराने तवांग क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक (एलएसी) शस्त्रास्त्र सज्जता आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. उर्वरित अरुणाचल प्रदेशातही (आरएएलपी) अशाच प्रकारचा प्रयत्न सुरू आहे. रस्ते, पूल, बोगदे, निवास, साठवण सुविधा, हवाई वाहतूक सुविधा आणि दळणवळणाचे अद्ययावतीकरण आदी पायाभूत सुविधांबरोबरच अप्पर दिबांग खोऱ्यात चिनी सैनिकांवर पाळत ठेवणे यांचाही त्यात समावेश आहे.
चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमधील पूर्व लडाखमध्ये २०२०मध्ये झालेल्या चकमकीपूर्वी, चिनी तळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून खूप दूर होते. परंतु त्यानंतर मात्र चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ सरकण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांत चीनने पश्चिम क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पूर्व आणि मध्य क्षेत्रांमध्ये चीनच्या हालचाली वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी याआधी सांगितले होते. भारती आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पश्चिम (लडाख), मध्य (हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड), सिक्कीम आणि पूर्व (अरुणाचल प्रदेश) क्षेत्रात विभागली गेली आहे.