आज दि.४ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन, वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन झाले. वयाच्या ९४ वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुलोचना दीदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती.सुलोचना दीदी यांची शनिवारी प्रकृती चिंताजनक बनली होती. रात्री उशिरा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याआधी त्यांना ऑक्सिजन दिला जात होता. मार्च महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा श्वास घेण्यात अडचण येत होती. ३ आठवडे उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली होती.

WTC फायनल ड्रॉ झाली तर विजेता कोण? 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. WTC फायनलसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जूनपर्यंत हा सामना होणार आहे. डब्ल्यूटीसी फायनल ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद जाहीर केले जाईल.इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. या पाच दिवसांच्या काळात हवामान विभागाने पावसाची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. या महत्त्वाच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणू नये अशी चाहत्यांची इच्छा आहे. सुरुवातीच्या चार दिवसात तरी पावसाचे ढग नाहीत. तरीही काही कारणाने सामन्याचा खेळ वाया गेल्यास त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद आहे.

कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे गारपीट

बळीराजाचे मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लागले आहेत. मान्सून अद्याप राज्यात दाखल झाला नाही. मात्र राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. जळगाव, अहमदनगर, धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण असून, वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आहे.

सांगलीत भरदिवसा ज्वेलरी दुकानावर दरोडा, ५ कोटींचे दागिने लंपास

सुवर्णालंकार खरेदीसाठी ग्राहक म्हणून आलेल्या टोळीने पिस्तुलचा धाक दाखवत, कर्मचाऱ्यांना बांधून भरदिवसा ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रकार सांगली मार्केट यार्डजवळ घडला. कोट्यावधीचे दागिने दरोडेखोरांनी लंपास केले.रिलायन्स ज्वेल्स या नावाचे तयार दागिने विक्रीचे दुकान मुख्य सांगली-मिरज मार्गावर आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ग्राहक म्हणून दुकानात आलेल्या पाच ते आठ लोकांनी पिस्तुलाचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना बांधले. ओरडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावून धमकावत अख्खे दुकान साफ केले. शोकेसमधील सर्व दागिने लंपास केले. व्यवस्थापकाला मारहाण केली. या दरम्यान अन्य एक ग्राहक पळून जात असताना त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. तो बचावला मात्र, रेलिंगवरुन पडल्याने जखमी झाला.

नियम झुगारून प्रेक्षकांवर जाहिरातींचा भडीमार! दूरचित्रवाहिन्यांना जाहिरातींसाठी दर तासाला केवळ १० मिनिटे वेळ

दूरचित्रवाहिनीवरील कोणतेही चॅनल बघताना कार्यक्रमापेक्षा जाहिरातींचाच अधिक भडीमार होतो, असा अनुभव सर्व स्तरातील प्रेक्षकांचा आहे. मात्र एक तासाच्या कार्यक्रमात किमान १० मिनिटे व्यवसायिक जाहिराती दाखवता येतात, हे माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पखाले यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत दूरचित्रवाहिनीवर जाहिराती प्रसारित करण्याबाबत काय नियम आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयास मागविली. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा, १९९५ ची कार्यक्रम संहिता आणि विहित जाहिरात कोडचे पालन करणे सर्व दूरचित्रवाहिन्यांना बंधनकारक आहे. या संहितेचे पालन बहुतांश दूरचित्रवाहिन्या करतात. जाहिरात संहितेच्या नियम ७ (११) नुसार चॅनल्सवर कोणत्याही कार्यक्रमात प्रति तास बारा मिनिटांपेक्षा जास्त जाहिरात केली जाणार नाही, असे नमूद आहे

शिंदेशाही आणि घराणेशाहीबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर म्हणाले, “लोकांचे प्रश्न…”

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. या भागात अवधूतसह राज ठाकरे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच स्वतःला आणि इतरांना खुपणाऱ्या गोष्टींवरही राज यांनी भाष्य केलं. शिंदे सरकार निवडून आलं तेव्हा लोकशाही परत आली असं काही लोकांचं म्हणणं होतं, तर आपल्या पक्षात घराणेशाही ऐवजी लोकशाही टिकून राहावी यासाठी राज ठाकरे नेमकं काय करतात? असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी विचारला. राज ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे याचं उत्तर दिलं.राज ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं की लोकशाही किंवा घराणेशाहीपेक्षा एखादी परिस्थिती नीट हाताळली जाणं, लोकांचे प्रश्न सुटणं हे जास्त महत्त्वाचं आहे. लोकशाहीतून एखादी व्यक्ती निवडून आली अन् जर ती काम करत नसेल किंवा घराणेशाहीतून एखादी व्यक्ती निवडून आली जी काम करत असेल तर त्यावर तुम्ही काय म्हणणार? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज आले, याला तुम्ही घराणेशाही म्हणणार का? आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने देश चालवला ती गोष्ट वाखाणण्याजोगी आहे.”

“राम जन्मभूमी खटल्याचा निकाल देऊ नये यासाठी…”, माजी न्यायमूर्तींचा खळबळजनक दावा

देशातील आजवरचा बहुचर्चित खटला म्हणजेच अयोध्येतील रामजन्मभूमीवरील वाद. राम जन्मभूमी – बाबरी मशीद खटल्याप्रकरणी निर्णय देणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (निवृत्त) सुधीर अग्रवाल यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका कार्यक्रमात बोलताना सुधीर चौधरी म्हणाले, रामजन्मभूमी प्रकरणी खटल्याचा निकाल देऊ नये यासाठी माझ्यावर दबाव होता. मी निर्णय दिला नसता तर अजून २०० वर्ष या प्रकरणाचा निकाल लागला नसता.सुधीर चौधरी हे २०१० मधील राम जन्मभूमी विरुद्ध बाबरी मशीद खटल्याप्रकरणी महत्त्वाचा निकाल देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा भाग होते. २३ एप्रिल २०२० रोजी ते उच्च न्यायालयातून निवृत्त झाले.

“…म्हणून कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला”, ओडिशा रेल्वे दुर्घटनेबाबत मोठा खुलासा

ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले. यानंतर हा भीषण अपघात का झाला, त्यामागील कारणं काय याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच या अपघातामागील एका मोठ्या कारणाचा खुलासा झाला आहे. यानुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. त्यातूनच अपघात झाला, असं वृत्त एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात इतका भीषण होता की, या रेल्वेचे २१ डबे रुळावरून घसरले आणि ३ डबे तर थेट दुसऱ्या मार्गावर जाऊन पडले.कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर थांबा नसल्याने कोरोमंडल भरधाव वेगाने प्रवास करत होती. याचवेळी कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा बाजार रेल्वे स्टेशन येथे एका मालवाहू रेल्वेला धडक बसली आणि कोरोमंडलचे २१ डबे रुळावरून खाली उतरले. इतकंच नाही, तर तीन डबे जोरदार धडकेने उडून दुसऱ्या रेल्वे मार्गावर पडले.यावेळी यशवंतपूर-हावरा एक्स्प्रेस बहानगा बाजार रेल्वे स्टेशन येथून जात होती. तेव्हा हावरा एक्स्प्रेसची रेल्वे मार्गावरील दोन डब्यांना धडक होऊन अपघात झाला.

बेन स्टोक्सने रचला इतिहास; १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच कर्णधार

इंग्लंड आणि आयर्लंड संघांतील एकमेव कसोटी सामना शनिवारी पार पडला. लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडवर १० गडी राखून विजय मिळवला. या कसोटी सामन्यात आयर्लंडचा पहिला डाव ५६.२षटकांत १७२ धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव ४ गड्यांच्या मोबदल्यात ५२४ धावा करून डाव घोषित केला.त्यानंतर दुसऱ्या डावात आयर्लंडने ९ विकेट गमावत ३६२ धावा केल्या आणि इंग्लंडला ११ धावांचे लक्ष्य दिले. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडने केवळ ४ चेंडूतच लक्ष्य गाठले. यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एक अनोखा विक्रम करत इतिहास रचला आहे. या विजयासह तो कसोटी क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात फलंदाजी, गोलंदाजी किंवा किपिंगशिवाय सामना जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.