आज दि.५ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

‘शिंदे-फडणवीस’ सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त, या मंत्र्यांना डच्चू मिळणार!

गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून होणार होणार म्हणून ज्याची चर्चा होती तो शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरचं होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मात्र या विस्तारात काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय, त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नगरमध्ये नामांतराच्या घोषणेनंतर झळकले औरंगजेबाचे फोटो, मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्याच आठवड्यात अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करणार असल्याची घोषणा केली. यानंतर आता अहमदनगरच्या एका कार्यक्रमाच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागात दर्गाच्या संदलचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुकुंद नगर भागातील मुलांनी डीजे लावला होता, त्यामध्ये एमआयएमचे शहराध्यक्ष सरफराज जागीदार यांच्यासह अनेक युवकांनी हातामध्ये औरंगजेबाचे फोटो झळकावले. याच्या तीव्र प्रतिक्रिया नगर जिल्ह्यामध्ये उमटत आहेत. अनेक युवकांच्या हातामध्ये औरंगजेबाचे फोटो दिसल्याने नगरमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

 ‘दलित असल्यामुळे 5 मुलींनी नाकारलं’; हास्यजत्रा फेम अभिनेत्यानं समोर आणला ब्रेकअपचा धक्कादायक खुलासा

पृथ्वीकनं आपल्या अभिनयाच्या जोरावर सिने-इंडस्ट्रीत आपलं नाव कामावलं. दरम्यान पृथ्वीक त्याचं आडनाव न लावता पृथ्वीक प्रताप हे नाव लावतो. यावरून त्याला अनेकदा प्रश्न विचारले जातात.आपल्या नावापुढे आडनाव न लावण्याचं कारण सांगत पृथ्वीकनं धक्कादायक खुलासा केला आहे.एका मुलाखतीत बोलताना पृथ्वीक म्हणाला, “जेव्हा तुम्ही कुलकर्णी, शिंदे, पाटील असं आडनाव सांगता तेव्हा तुम्हाला लगेच जज केलं जातं. मी लहानपणापासून याचा अनुभव घेतला आहे”.”माझं आडनाव कांबळे आहे. मला माझ्या जातीबद्दल कमीपण कधीच वाटत नाही. मी सगळ्यांना आदर करतो. पण आडनाव काढून टाकलं तर त्या व्यक्तीला माणूस म्हणून ट्रीट केलं जातं”.”आपल्याकडे आडनाव सांगितलं की लगेच लोक त्याला त्याची जात विचारतात. जातीमुळे माझे 5 ब्रेकअप झाले. आधीच्या तिघींनी मला जातीवरून रिजेक्ट केलं”.

जगातील रहस्यमय गाव, इथे माणसच काय पशू-पक्षीही आहेत आंधळे

आपलं जग हे अनेक रहस्यमयी गोष्टींनी भरलेलं आहे. अशा अनेक विचित्र गोष्टींबद्दल तुम्ही ऐकलं असेल ज्याची उत्तरच आजपर्यंत मिळालेले नाहीत. शिवाय अशा देखील अनेक गोष्टी आहेत. ज्याबद्दल ऐकून आपल्याला विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसेल. अशाच एका रहस्यमयी गावाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल.मेक्सिकोतील एका गावाचा देखील या रहस्यमय ठिकाणांमध्ये समावेश आहे. या गावाचं नाव आहे टिल्टपेक. येथे राहणारे सगळेच लोक आंधळे आहेत. त्यांना काहीही दिसत नाही. म्हणजे मुलं जन्माला आल्यानंतर त्यांना सगळं व्यवस्थीत दिसत असतं. मात्र कालांतराने त्यांना दिसणं बंद होतं. ज्यामुळे येथील लोक आंधळे होतात. एवढंच काय तर येथील जनावरं आणि पक्षी देखील आंधळे आहेत.

सुलोचना दीदी अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.वयाच्या 94 वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळ आणि श्वसनाचे आजार यामुळे त्यांचे दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सोमवार 5 जून रोजी त्यांच्या पार्थिवावर 5.30 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्काराच्यावेळी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.सुलोचना दीदी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी ठेवण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री आणि अनेक दिग्गजांनी सुलोचना दीदींचं अखेरचं दर्शन घेतलं.

असं असतं बापाचं काळीज! मृतांच्या यादीत नाव असलेल्या मुलाला मृतदेहांच्या ढिगातून जिवंत शोधलं

ओडिशा ट्रेन अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताने सगळा देश हादरला. या अपघातानंतर ५१ तास वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरु होतं. या अपघातानंतर गदारोळ आणि गोंधळही झाला. तसंच मृतदेहांची ओळखही पटवली जात होती. मात्र हेलाराम मलिक यांना आशा होती की आपला मुलगा जिवंत आहे. त्यांनी शोध सुरुच ठेवला अखेर मृतदेहांच्या ढिगातून त्यांनी आपल्या मुलाला शोधलंच. या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे.ओडिशा ट्रेन अपघातात २४ वर्षीय बिस्वजीत मलिक हा मुलगा बेशुद्ध होऊन पडला होता. त्याचा मृत्यू झाला आहे असं बचाव पथकाला वाटलं होतं. त्यामुळे या मुलाला मृतदेहांच्या ट्रकमध्ये ठेवलं गेलं. हा ट्रक शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जाणार होता. त्यावेळी हेलाराम मलिक यांनी आपल्या मुलाचा शोध सुरु केला. या मृतदेहांच्या ट्रकमध्ये त्यांना आपल्या मुलाचा हात हलताना दिसला. त्यावेळी त्यांनी तातडीने बचाव पथकाला सांगितलं माझा मुलगा जिवंत आहे. त्यानंतर कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयात मुलाला आणलं गेलं. डॉक्टर म्हणाले की बिस्वजीत मलिकची प्रकृती नाजूक आहे. काही दिवसात त्याच्यावर सर्जरी करण्यात येईल. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

मान्सून लांबला! केरळ किनारपट्टीवर दोन ते तीन दिवसांनी दाखल होण्याची शक्यता

भारतीय हवामान खात्याने चार जूनला मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. पण, मान्सूनला केरळ किनारपट्टीवर दाखल होण्यासाठी आणखी २ ते ३ दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता हवामान विभागाने सोमवारी ( ५ जून ) वर्तवली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना आणखी काही दिवस उन्हाची झळ सोसावी लागणार आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. ४ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पण, “अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होण्यास अडथळा होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनचे आगमन होऊ शकते,” असं हवामान विभागातील अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

योगी आदित्यनाथ इतक्या कोटींचे आहेत मालक

आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ५१ वा वाढदिवस आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपचे मातब्बर नेते मानले जातात. उत्तराखंडच्या पंचूर या गावी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव अजय सिंह बिष्ट आहे. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि आपले नाव बदलले. संन्याशीपासून ते एका राजकारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरित करणारा आहे पण तुम्हाला माहिती आहे का योगी आदित्यनाथ यांच्याजवळ किती संपत्ती आहे ?‘इंडिया टुडे’नी दिलेल्या वृत्तानुसार या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्याजवळ १.५४ कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. ही रक्कम त्यांच्या एकूण सहा बँक अकाउंट आणि सेव्हिंगमधील आहे. याशिवाय त्यांच्याकडे १ लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि ८० हजाराची रायफल आहे.प्रतिज्ञापत्रात सांगितल्याप्रमाणे, योगीं यांच्याजवळ १२,००० रुपयांचा सॅमसंगचा फोन आहे. २० ग्रॅमचे कानातले आहे, ज्याची किंमत ४९,००० रुपये आहे तर सोन्याच्या चेनसह रुद्राक्ष असा गळ्यात घालणारा १० ग्रॅमचा दागिना आहे, ज्याची किंमत २०,०००रुपये आहे.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात नंबर १, देवेंद्र फडणवीसांची माहिती

परदेशातील उद्योगांद्वारे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीत महाराष्ट्र हे राज्य इतर सर्व राज्यांच्या पुढे गेलं आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर १! देशातल्या परकीय गुंतवणुकीत २९ टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.