पुण्यात 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील कुस्तीवरून सुरू झालेला वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड याने सिकंदर शेख या मल्लाला खालची टांग डाव वापरत चार गुण मिळवून पराभूत केल होतं. मात्र पंचांनी दोन गुण देण अपेक्षित असताना चार गुण दिल्याने सिकंदरचा पराभव झाला. हा सिकंदरवर अन्याय झाला असल्याचा दावा सिकंदर समर्थकानी सोशल मीडियावर केला. दरम्यान, सामन्याचे पंच मारूती सातव यांना एकाने धमकी दिली असल्याची तक्रार सातव यांनी स्पर्धा अध्यक्षांकडे केली आहे. त्यानंतर याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतंय.
महाराष्ट्र केसरीच्या मातीवरच्या फायनल मध्ये सोलापूरचा पहिलवान महेंद्र गायकवाडने खालची टांग लाऊन सिकंदर शेख या पैलवानाचा धक्कादायक पराभव केला. मात्र या खालची टांगसाठी महेंद्रला दिलेले चार गुण हा चुकीचा निर्णय असल्याचा दावा सिकंदर समर्थकांनी सुरू केला. सामन्यादरम्यानही सिकंदरच्या प्रशिक्षकांनी पंचांच्या निर्णयाला आक्षेप घेतला होता. तेव्हा ज्युरींनी पुन्हा व्हिडीओ रेफरल घेत महेद्र गायकवाडला चार गुण तर सिकंदर शेखला 1 गुण दिला होता. त्यामुळे सिकंदर शेख या लढतीत पराभूत झाला.
स्पर्धा अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सिकंदर शेख हा अतिशय ताकतीचा प्रचंड लोकप्रिय मल्ल आहे. त्याने उत्तरेतल्या अनेक पैलवानांना अस्मान दाखवलंय. तोच पराभूत झाल्याने त्याच्या समर्थकांना मोठा धक्का बसलाय. सिकंदर शेख याचा काही आक्षेप असेल तर त्यांनी तो स्पर्धा अध्यक्ष यांना पाठवावा. पंचांचा निर्णय चुकीचा असेल तर त्यांच्यावर कारवाईची शिफारस करू असंही ते म्हणालेत.
आता सिकंदर समर्थक असलेले संग्राम कांबळे हे मुंबई पोलीस दलातील शिपाई आहेत. त्यांनी थेट मुख्य पंच मारूती सातव यांना फोनवरून धमकी दिल्याची तक्रार पंच मारूती सातव आणि ज्युरी दिनेश गुंड यांनी स्पर्धा अध्यक्षांकडे केलीय. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याच मारूती सातव यांनी सांगितलंय.