आज दि.६ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

WTC Final आधी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा खेळणार की नाही?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या 7 जून पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच सुरु होणार आहे. लंडन येथे ही स्पर्धा खेळवली जाणार असून ही मॅच सुरु होण्याआधीच टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.7 जून ते 11 जून या दरम्यान लंडन येथे केन्सिंग्टन ओव्हल या स्टेडियमवर WTC स्पर्धेची फायनल मॅच खेळवली जाणार आहे. दुपारी 3 वाजल्यापासून ही मॅच खेळवली जाणार असून यास्पर्धेसाठी भारतीय संघ लंडन येथे पोहोचला आहे. परंतु मॅचच्या आदल्या दिवशी प्रॅक्टिस करत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा, स्पेशल विमानाने नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

भाजप-शिवसेना तसंच महाविकासआघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सगळ्याच पक्षांच्या नेत्यांकडून जागा वाटपाबाबतचा आढावा घेतला जात आहे, पण तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. भागीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेटीला गेले आहेत. केसीआर यांनी भालकेंसाठी खास विमान पाठवलं आहे.भागीरथ भालके तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे रवाना झाले आहेत. केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवलं. भागीरथ भालके 2024 मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय ठरतं, यावर बरंच काही अवलंबून आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अ‍ॅक्टिव मोडमध्ये

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता मनसेनं कबंर कसली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मनसे पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच निवडणुकीसाठी मनसेकडून खास प्लॅनची देखील आखणी करण्यात आली आहे. नव्या प्लॅननुसार आता मनसेकडून नाका तिथे शाखा उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

भारतातील हे गाव मानत नाही संविधान, स्वत:च्या कायद्यासह आणखी रंजक गोष्टी

भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतःची वेगळी परंपरा आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात विविध परंपरा असलेले असेच एक गाव आहे. कुल्लू जिल्ह्यातील मलाना गावाचा स्वतःचा वेगळा कायदा आहे. तसेच हा गाव भारत देशाचा कोणताही कायदा मानत नाही.

या गावात पर्यटकांना कोणत्याही गोष्टीला स्पर्श करण्यास बंदी आहे. बाहेरील व्यक्तीने येथे कोणत्याही गोष्टीला हात लावल्यास त्यांना 1000 रुपये दंड भरावा लागेल. हा दंड 2,500 रुपयांपर्यंत ठोठावला जाऊ शकतो.मलाना गावात हे निर्बंध इतके काटेकोरपणे लागू केले गेले आहेत की, बाहेरून येणारे लोक येथील दुकानात ठेवलेल्या वस्तूंना हातही लावू शकत नाहीत. येथे येणारे पर्यटक खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर पैसे ठेवतात. यानंतर, दुकानदार पर्यटकाने सांगितलेल्या वस्तू दुकानासमोर जमिनीवर ठेवतो.

अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ

उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळण्याकरता पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण, खोल अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असून याचा परिणाम केरळात धडकणाऱ्या मान्सूनवर होणार आहे. परिणामी कोकणाच्या दिशेने सरकत येणारा मान्सूनही उशिरा होणार आहे.

ग्रामोद्योग वस्तूविक्रीसाठी मोठय़ा शहरांत जागा; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे महत्त्वाचे योगदान असून या उद्योगांना चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच विस्तारित केंद्रांसाठी १५ विविध ठिकाणी जागा निश्चित केल्या असून काथ्या (कॉयर) उद्योग केंद्रासाठी कुडाळ येथे इमारत आणि खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी मोठय़ा शहरांमध्ये पालिकेच्या जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली.सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, केंद्रीय अतिरिक्त सचिव तथा विकास आयुक्त डॉ. रजनीश, सहसचिव अतिश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

“ब्रिटनमध्ये आश्रयासाठी येता आणि वर तक्रारी करता?” पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्थलांतरितांना सुनावलं!

ब्रिटनमध्ये सध्या इतर देशांमधून आश्रयासाठी येणाऱ्या नागरिकांचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे स्थानिक हॉटेल्स आणि इतर सुविधांवर ताण निर्माण होत असल्याचं दिसू लागलं आहे. यासंदर्भात ब्रिटन सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे स्थानिक सुविधांवर निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. या उपाययोजना फलदायी ठरत असल्याचं सांगतानाच त्याबाबत तक्रार करणाऱ्या स्थलांतरीतांची ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे.

कोरोमंडल ट्रेन अपघातातील १०१ मृतदेहांची अद्याप नाही पटली ओळख

ओडिशातल्या बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेत २८८ प्रवासी ठार झाले आहेत. तर १ हजारपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की या दुर्घटनेतील अद्याप १०१ मृतदेहांची ओळख पटणं बाकी आहे. रेल्वे प्रबंधक रिंकेश रॉय यांनी सांगितलं ओडिशातल्या विविध रुग्णालयांमध्ये २०० प्रवाशांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती पूर्व मध्य रेल्व मंडळाचे प्रबंधक रिंकेश रॉय यांनी दिली आहे.

ऐन निवडणुकीआधी राजस्थान काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप?

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात भाजपविरोधी पक्षांनी स्वतंत्र आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपाला पराभूत करता येऊ शकतं, अशा आशयाची विधानं विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच होणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी आडाखेही बांधले जात आहेत. याचदरम्यान राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा आहेत माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट! गेल्या काही दिवसांपासून सचिन पायलट यांनी आपल्याच पक्षाच्या राज्य सरकारविरोधात ठाम भूमिका मांडल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी असलेले तणावपूर्ण संबंध चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात आता सचिन पायलट काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त ‘द वीक’नं दिलं आहे. या वृत्तानुसार सचिन पायलट लवकरच काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा करणार असून नवा पक्ष स्थापन करणार आहेत. नव्या पक्षाच्या घोषणेची तारीखही ठरल्याचं सांगितलं जात आहे.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: त्सित्सिपास, रुडची आगेकूच; महिला गटात जाबेऊर

 चौथ्या मानांकित नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि पाचवा मानांकित ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. महिला गटात सातव्या मानांकित टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर, दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का,अमेरिकेची कोको गॉफ, ब्राझीलची बीअट्रिज हद्दाद माइआ तसेच, युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.