महाराष्ट्रातील करोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी लस संपल्याचे फलक झळकले. लसींचे डोस संपल्यामुळे
आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागलं. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसीमधील लसीकरण केंद्रातील लसींचा पुरवठा संपल्याचे बोर्ड केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आल्याचं दिलं आहे. या लसीकरण केंद्राबाहेर व्हॅक्सिन आऊट ऑफ स्टॉक म्हणजेच लसी संपल्या आहेत असा बोर्ड झळकलाय.
या लसीकरण केंद्राचे प्रमुख असणाऱ्या राजेश डेरे यांनी यासंदर्भात एएनआयला माहिती दिली. कोविशील्डचे ३५० ते ४०० डोस केंद्रात होते. हे डोस मंगळवार सकाळपासून येथे नोंदणी करुन येणाऱ्या नागरिकांना देण्यात आलेत. मात्र त्यानंतर येथे लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे आता पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागणार असल्याचं डेरेंनी स्पष्ट केलं आहे. दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सीनचे दोन हजार डोस उपलब्ध असून ते आज दिवसभरात दिले जाणार असल्याचंही डेरे म्हणाले.
“संध्याकाळपर्यंत आम्हाला कोव्हिशील्डचे डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं आहे. असं झाल्यास पुन्हा लसीकरण सुरु केलं जाईल. कोविशील्डच्या लसी संपल्यासंदर्भात आम्हाला काल रात्री उशीरा माहिती मिळाली,” असंही डेरे म्हणालेत. मुंबईतील लस टंचाईचा मंगळवार हा सलग तिसरा दिवस ठरला आहे. सोमवारीच मुंबईत ३१ खासगी लसीकरण केंद्र लससाठ्या अभावी बंद ठेवण्यात आली. दिवसभराती लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्रही दिसून आळं. सोमवारी केवळ ३५ हजार ३०९ लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १० हजार लोकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली.