गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या आठवणी दिवसेंदिवस गडद होत आहेत. माझ्या मनात अफाट त्रास असेल, वाटय़ाला दु:ख आले असेल, पण स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. खोटे बोलून राजकीय स्थान मिळवता येत नाही. कोणतेही संकट बाजूला सारून उभे राहण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे, अशा शब्दात भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी दूरचित्र समाजमाध्यमातून बोलताना आपल्या समर्थकांना विश्वास दिला.
यावर्षी गोपीनाथगडावर न येता सर्वानी आपापल्या भागात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम घेतले. पंकजा म्हणाल्या,की महापुरुषांना जातीवरून वाटू नका. जातीभेद नष्ट करण्यासाठी या लोकांनी आयुष्य वेचले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल चुकीचे बोलले जाऊ नये. त्यांना जातीत विभागणे भयंकर आहे.