पुण्यात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना कल्याणमध्ये घडली आहे. कोरोना काळात अनेक रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टर पिता पुत्रांचा कोरोनानेच जीव घेतला आहे. अवघ्या दोन दिवसाच्या अंतरानं मिश्रा कुटुंबानं दोन कर्तेधर्ते पुरुष गमावले आहेत.
डॉ. नागेंद्र मिश्रा यांचं टिटवाळ्यातल्या खडवली भागात गेल्या 22 वर्षांपासून क्लिनिक होतं. याच क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ रुग्णांची सेवा केली. त्यांचा मुलगा डॉ. सुरज मिश्रा यांचं भिवंडीच्या बापगावात क्लिनिक आहे. दोघेही गोरगरिबांची सेवा करत होते. कोरोनाच्या काळातही ह्या सेवेत खंड पडलेला नव्हता. अनेक वेळेस त्यांनी रुग्णांवर मोफत उपचार केले. याच दरम्यान त्यांना कोरोना गाठलं.
एकेदिवशी अचानक डॉ. नागेंद्र मिश्रा यांना ताप आला. तपासणी अंती त्यांना कोरोनाचं निदान झालं. नंतर उपचारासाठी त्यांची वणवण सुरु झाली. कल्याण डोंबिवलीत डॉ. नागेंद्रना बेड मिळाला नाही. शेवटी ठाण्यात वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलगा डॉ. सुरज मिश्राही याच काळात कोरोनाने बाधित झाले. त्यांना गोरेगावात एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाप लेकांना कोरोना झालेला असताना, हे कमी म्हणून की काय, सुरज यांच्या आईलाही कोरोनानं गाठलं. त्यांना वसई विरारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोठा मुलगा आणि त्याची पत्नी हे घरीच क्वारंटाईन झाले. एका अर्थानं डॉ. मिश्रांचं 6 जणांचं कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात अडकलं. गोरेगावात भरती असलेला मुलगा डॉ. सुरज मिश्रा यांचं तीन दिवसांपुर्वी म्हणजेच बुधवारी निधन झालं तर वडील डॉ. नागेंद्र मिश्रा यांचं काही तासातच पहाटे निधन झालं. दोघांचीही प्रकृती हळूहळू खालावत गेली. विशेष म्हणजे डॉ. नागेंद्र मिश्रा यांना त्यांच्या वाढदिवशीच मृत्यूनं गाठलं. विशेष म्हणजे डॉ. सुरजचं नोव्हेंबर महिन्यात लग्न झालं होतं. डॉ. नागेंद्र यांनी तर लसीचा पहिला डोसही घेतला होता. दुसरा घेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.