महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला होता. याला प्रत्युत्तर देताना मै झुकेंगा नही, मै घुसेगा असं म्हणत फडणवीस यांनी मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचं म्हटलं होतं. यावर आता खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली. हे तर भिजलेलं काडतूस असं म्हणत राऊतांनी फड़णवीसांना टोला लगावला.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही कुठं बोललो झुका म्हणून, हे सगळे झुके आहेत. डॉक्टर मिंधे यांच्या टोळीने एका आमच्या महिलेवर हल्ला केला. त्यांना भेटीसाठी उद्धव ठाकरे गेले होते. त्या महिलेवर हल्ला झाला. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नपुसंक म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सौम्य शब्दात टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी मी काडतूस आहे असं वक्तव्य करत महाविकास आघाडीला इशारा दिला होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे तर भिजलेली काडतूस आहेत. इडी सीबीआय बाजूला ठेवून या. तुम्ही गृहमंत्री झाल्याची अडचण महाराष्ट्राला आहे. तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात तीन लोकांनी आत्महत्या केल्या. तुम्ही आम्हाला धमक्या देता. इडी आणि सीबीआय तुमचे बॉडीगार्ड आहेत असा आरोपही राऊतांनी केला.
तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. ठाण्यात परवानगी देण्यात आलेली नाही, त्यांच्या हातात काही नाही. त्यांना अयोध्या आम्ही दाखवली. मुख्यमंत्री असल्याने अयोध्येच्या गल्ल्या माहित झाल्या असतील. हे बेळगावला पण गेले नव्हते असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरून टीका केली.