हंगामी फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा हे उन्हाळ्यातील आपल्या सर्वांचे आवडते फळ आहे. क्वचितच लोक असे असतील ज्यांना आंबा खाणे आवडत नाही. चवीला उत्तम असणाऱ्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन बी 6 , व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय प्रथिने , कार्बोहायड्रेट , फॅट्स आणि पोटॅशियम देखील असते. आंब्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियमचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते एक सुपरफ्रुट म्हणून ओळखले जाते. आंब्याच्या चवीमुळे लोक खूप आंबे खातात. मात्र आंबा हे उन्हाळ्यातील हंगामी फळ असले तरी ते प्रमाणात खाणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला जास्त प्रमाणात आंबे खाल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि एकावेळी किती आंबे खावे याबद्दल माहिती देणार आहोत.
जास्त प्रमाणात आंबा खाण्याचे दुष्परिणाम…
– आंब्याचे गुणधर्म उष्ण असल्यामुळे शरीरातील उष्णता वाढून त्वचेवर पिंपल्स, येण्याच शक्यता असते.
– कच्चा आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
– जास्त प्रमाणात आंबा खाल्याने पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.
– काही लोकांना आंब्याच्या अतिसेवनामुळे अॅलर्जी किंवा घसा खवखवण्याची समस्या होऊ शकते. आंब्याचा वरचा भाग व्यवस्थित साफ न केल्यास किंवा आंबा कापताना त्याचे दूध काढले गेले नाही तर यामुळे घसा खवखवण्याची समस्या उद्भवते.
– ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आंब्याचे सेवन करावे.
– गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आंब्याचे सेवन करावे.
– प्रमाणापेक्षा जास्त आंबे खाल्ल्याने वजन वाढणे आणि मधुमेह या दोन्हींचीही शक्यता संभवते.
– कच्चा आंबा खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळावे. कारण आयुर्वेदानुसार हे मिश्रण योग्य नाही.
– रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्ल्याने तुमच्या शरीरास ते अपायकारक ठरू शकतात.
प्रमाणात खावा आंबा
आंबा हे एक उष्ण फळ आहे. त्यामुळे तुम्ही आंब्याचे प्रमाणात सेवन केले तर यामुळे काहीही नुकसान होत नाही. मात्र आंबा खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, तसेच त्वचेवर अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे एका दिवसात 2 पेक्षा जास्त आंबे खाऊ नये. तसेच आंबे खाण्यापूर्वी ते किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावे. यामुळे आंब्याची उष्णता कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आंबा कोणत्या वेळी खावा असाही प्रश्न अनेक जणांना पडतो. तर आंबा खाण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याची वेळ. यावेळी आंबा खाल्ल्याने शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते. कारण आंबा आपल्या शरीरातील क्षार भरून काढतो आणि दिवसभर आपल्याला उत्साही राहण्यास मदत करतो.