जवळपास दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता. शेवटच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहात निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
विसर्जन घाटावर ११ भावीकांना विजेचा झटका; पनवेलमधील मोठी दुर्घटना
पनवेल पालिका क्षेत्रात कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेशभावीकांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शाॅक (झटका) लागल्याने एकच खळबळ माजली. डोक्यावर पाऊस पडत असताना लाडक्या गणेशबाप्पांना निरोप देत असताना ही घटना घडली.
पुणे : पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने मानाच्या बाप्पांना निरोप
तब्बल दहा तास चाललेल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सांगता झाली. सनई चौघड्यांचे वादन, बॅण्ड पथके आणि ढोल ताशांचा गजर तसेच रांगोळीच्या आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या अशा पारंपारिक आणि भक्तीमय वातावरणात मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी विसर्जन मार्ग दुमदुमून गेला.
नवी मुंबईत भर पावसात विसर्जनाचा उत्साह कायम, संध्याकाळी ७ .३० पर्यंत २२ मिमी पावसाची नोंद
नवी मुंबई शहरात १० दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येत असून शहरात २७५ सार्वजनिक गणेश मंडळांचा व हजारो घरगुती गणरायांचा विसर्जन सोहळा दुपारी ४ वाजल्यापासून सुरु झाला. परंतु ४.३० वाजल्यापासूनच शहरात जोरदार पावसाने सुरवात केली. त्यामुळे विसर्जन मिवणुकीदरम्यान भक्तांना अनेक अडचणी आल्या. परंतु भक्तांचा जोश कायम होता.
पुणे : आठ तासात मानाच्या चार गणपतींचे विसर्जन
दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या पुण्याच्या दिमाखदार गणेश विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या चार गणपतींच्या विसर्जनालाच आठ तास लागले. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या अनेक मंडळांना दीर्घ काळ वाट पाहावा लागत आहे.
उरण मध्ये विसर्जनाला उत्साहात सुरुवात; पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित
सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने विसर्जनासाठी आलेल्या भक्तांची तारांबळ उडाली होती मात्र तासाभराने पावसाने उसंत घेतल्या नंतर पुन्हा एकदा विसर्जनाला सुरुवात झाली असून भक्तांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे टाळ, मृदुंग व भजनाच्या तालावर व ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत गणेशभक्तानी मिरवणुका काढून विसर्जनाच्या ठिकाणी येत होते.
उत्सवी उत्साहातही रुग्णवाहिकांना मार्ग देण्यासाठी पोलिस आणि नागरिक तत्पर
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांचा आनंद लुटण्यासाठी टिळक चौक नागरिकांनी फुलून केला असतानाही रुग्णवाहिकांना मार्ग काढून देण्याची तत्परता नागरिकांकडून दाखवण्यात आली. त्यांना पोलिसांचे सहकार्यही मिळाले. पावणेसहाच्या दरम्यान, टिळक चौकात मानाचा तिसरा गुरुजी तालीम सार्वजनिक गणपती दाखल होण्यापूर्वी रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन टिळक चौकात दाखल झाली.
विसर्जन मार्गावर ध्वनिवर्धक, ढोल ताशांचा दणदणाट; आवाजाची तीव्रता मर्यादेबाहेर
विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.
पुणे : अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला गणपती विसर्जन रथाद्वारे सलाम
महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीला सलाम म्हणून पत्र्या मारुती गणपती मंडळाने विशेष विसर्जन रथ तयार केला आहे. ‘अशोक मामांचा हास्यरथ’ असे नाव असलेला हा रथ अशोक सराफ यांच्या गाजलेल्या विनोदी भूमिका आणि संवादांच्या कटआऊटने सजवण्यात आला आहे.
वाजत गाजत ‘नागपूरच्या राजा’ला निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात दहा दिवसांच्या मुक्कामानंतर नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी तुळशीबाग येथील नागपुरच्या राजाची विसर्जन मिरवणूक निकाली व कोराडी येथे मूर्ती विसर्जित करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांची पुण्यातील गणेशोत्सव संपर्क मोहीम फलदायी होईल का ?
पावसात भिजत, कार्यकर्त्यांची संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजित नऊ मंडळांऐवजी एकूण २५ मंडळांना भेटी दिल्या. शहरातील प्रमुख सार्वजनिक मंडळांचे सामाजिक आणि राजकीय महत्व लक्षात घेत संपर्क मोहीम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी फलदायी ठरणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.