जळगाव जिल्हा प्रशासन आणि ‘वोपा’ च्या माध्यमातून ‘व्ही स्कूल’ प्रणालीचे उद्घाटन

जळगाव जिल्हा प्रशासन आणि ‘वोपा’ या सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या ‘व्ही स्कूल’ या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, प्रसिद्ध सिनेअभिनेते ललित प्रभाकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका दीपा देशमुख, अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, नाशिक शिक्षण विभाग उपसंचालक उपासनी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इंटरनेटपासून ते अगदी अभ्यासासाठी वेळेत फोन मिळेपर्यंत अनेक गोष्टी यामध्ये असतात. या साऱ्याचा विचार करून ‘वोपा’ने ‘व्ही-स्कूल’ या ॲपची निर्मिती केली आहे. यामध्ये मल्टीमिडीया पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध केला गेलाय. अभ्यासाचे ऑफलाईन डाऊनलोडिंग शक्य आहे. तसेच, यात एकाच फोनवरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकतील. यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक आणि प्रशासन सहकार्य करणार आहेत.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जळगाव जिल्हा या शैक्षणिक ॲपमध्ये संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. यानिमित्ताने उर्दू भाषेतील शैक्षणिक साहित्य ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येईल, असेही राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

अभिनेते पुष्कराज चिरपुटकरनेही या प्रकल्पाला अधिकाधिक मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले. ‘वोपा’चे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी ॲपची आवश्यकता आणि वैशिष्ट्ये सांगितली. अजहरन नदाफ यांनी शिक्षणविषयक गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली, तर ओंकार तोटे या विद्यार्थ्याने ऑनलाईन शिक्षणात या ॲपमुळे खूप मदत होईल असे सांगितले. ‘वोपा’च्या संचालिका ऋतुजा जेवे यांनी सूत्रसंचालन केले. ‘वोपा’ने गेल्या शैक्षणिक वर्षात वेबसाईटच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले असून, गेल्या वर्षभरात सव्वा कोटी पेज व्ह्यूजसह ही वेबसाईट महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी वापरली आहे आणि आता मोफत ॲपच्या माध्यमातून ‘वोपा’ व जळगाव जिल्हा परिषद तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवत आहेत.

हे ॲप कसं डाऊनलोड करणार?

वोपा संस्थेच्या http://edu.vopa.in/learn/ या वेबसाईटला भेट देऊन हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे.

पीडीएफ, ऑडिओ, पीपीटी, इमेजेस, जीआयएफ इमेजेस, व्हिडीओ, गुगल फॉर्म अशा विविध माध्यमांचा वापर करून शिक्षण
कमी इंटरनेटमध्ये ऑनलाइन अभ्यास शक्य
अभ्यासाचे ऑफलाईन डाऊनलोडिंग करता येते
एका ऍपवरून 4 विविध इयत्तांचे विद्यार्थी अभ्यास करू शकतात.
विद्यार्थ्यांनी किती वेळ अभ्यास केला, याची नोंद होते.
कोणत्याही जाहिराती नाहीत.
आकर्षक व विचार करून डिझाईन केलेली रंगसंगती
अभ्यास एकाच ठिकाणी सेव्ह राहतो, व हरवत नाही.
ॲप कसं वापरावं?

  1. edu.vopa.in येथील लिंकवरून ॲप डाऊनलोड करता येईल.
  2. विद्यार्थ्यांना फोन नंबर टाकल्यावर त्यांना ओटीपी मिळेल.
  3. विद्यार्थ्यांना आपली माहिती भरून प्रोफाइल तयार करता येईल व त्यानंतर आपल्या इयत्तेचा अभ्यास सुरू करता येईल.
  4. दरवेळी लॉग इन करण्याची, पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.