सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील विशाल फटे प्रकरण ताजे असतानाच आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील भिशीचे प्रकरण पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरात सर्वात मोठी आर्थिक फसवणूक घोटाळा समोर आला असून लिलाव भिशीच्या माध्यमातून शेकडो जणांची आतापर्यंत 200 कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. इंदापूर शिवसेना वतीने हा आर्थिक घोटाळा समोर आणला असून या भिशीमध्ये फसवणूक झालेल्यांना त्यांची रक्कम परत मिळवेपर्यंत शिवसेना मदत करण्याची हमी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या चार पाच वर्षापूर्वी इंदापूर शहरात भिशी चालवणारे अनेक जण उदयास आले. या भिशी चालकांनी कुठलाही कायदेशीर आधार नसताना, कुठला टॅक्स नाही, की अधिकृत रेकॉर्ड नसताना रोखीत लिलाव भिशी सुरू केल्या. यात हातगाडी, टपरी, पथारी, मोलकरीण, भाजी विक्रेते असे अत्यंत किरकोळ छोटे व्यापारी ते बड्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना सामील केले. किरकोळ छोटे व्यापारी यांची वेगळी भिशी तर बड्या व्यावसायिकांची वेगळी भिशी केली. यात मोठ्या भिशीची रक्कम 50 लाख ते कोटी-दोन कोटींची तर किरकोळ व्यापाऱ्यांची 5-10 लाखांची व 10 लाखांच्या खाली किरकोळ छोटे व्यापारी होते.
भिशी चालकांनी भिशी ही काही ठराविक लोकांमध्ये सुरू केली. ही एक साखळी पद्धत आहे. यात भिशीमध्ये 20 किंवा त्यापेक्षा अधिक सभासद केले गेले. यात प्रत्येकाने किती रक्कम द्यायची ही अगोदरच ठरविली गेली. प्रत्येक सभासदाने ठरविल्याप्रमाणे (यात प्रत्येकी सात दिवस किंवा एक महिना) दिवसांनी प्रत्येक सभासदांनी ठरविलेली रक्कम भिशी चालकाकडे नियमित रोख स्वरुपात भरायची. भिशी चालकाने ती सर्व सभासदांकडून ती रक्कम गोळा करायची. नंतर या रक्कमेचा लिलाव केला जातो. ज्याला पैशाची गरज असेल तो हा लिलाव वाढवत जातो. जर त्याला भिशी परवडत असेल तर तो जास्तीचा लिलाव करून ती भिशी उचलतो. त्यानंतर त्या भिशीचा लिलाव जेवढा रुपयांचा झाला आहे. तेवढे रुपये कट करून त्याला ती सर्व सभासदांची जमलेली रक्कम दिली जाते. यात राहिलेल्या रक्कमेचे व्याज सगळ्यांमध्ये वाटून घेतात. असे प्रत्येक महिन्याला/ आठवड्याला 1 सभासद भिशी घेत असतो. हे सर्व अनधिकृतपणे असते.
भिशीचे विविध प्रकार असले तरी दोन प्रकारच्याच भिशी प्रसिद्ध आहेत. कमिशन बेसीस अर्थात लिलाव भिशी व बिन व्याजी भिशी या दोन पैकी लिलाव बेसीस भिशी अत्यंत जोखिमपूर्ण व लाभदायकही ठरते. त्यामुळे अनेकजण रिस्क स्वीकारून या भिशीत उतरतात. दरम्यान, शहराच्या बाजारपेठेतील जवळपास प्रत्येक व्यापारी पुकार भिशीच्या विळख्यात अडकलेला आहे. एक भिशी चालक किंवा मध्यस्थी हा एका वेळी दहा ते पंधरा पुकार भिशी चालवित असतात. बहुतांश वेळा भिशी मध्येच त्या बंद पाडायच्या किंवा बंद पडल्यानंतर असे भिशी चालक अर्ध्यातून भिशी बुडवून फरार झाले आहेत. त्यामुळे यात शेकडो जणांची कोट्यवधीची आर्थिक फसवणूक झाली.