काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत होता. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूचे संकटदेखील उभे टाकले आहे. मात्र सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दिलासा व्यक्त केला जातोय. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे आता राज्य सरकारने 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे शाळा सुरु करण्याच्या या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि राज्यातील परिस्थिती पाहून बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलीये. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपासून राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. रुग्णसंख्या वाढल्यामुळे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामध्ये इयत्ता 10वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु ठेवण्यात आले होते. मात्र सध्या करोनाची स्थिती चिंताजनक नसल्यामुळे शाळा पुन्हा एकदा सुरु करण्याची मागणी केली जात आहे. पालकांच्या याच मागणीमुळे आता येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला आहे. तशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच घ्याव्या लागतील असे शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. नववीची परीक्षा झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे गुण बोर्डाकडे नाहीत. त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच ऑफलाईन पद्धतीने परीक्षेची तयारी सुरू असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात येतंय. असे असले तरी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन याबाबत विद्यार्थ्यांत संभ्रम आहे.