महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे बिनकामाची मालमत्ता (NPA) असल्याचं म्हटलंय. त्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार पलटवार केलाय.
“महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले. UPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच”, असा टोला भातखळकर यांनी चव्हाणांना लगावलाय.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो ट्वीट केलाय. त्यावर देशातील सर्वात मोठे नॉन परफॉर्मिंग अँसेट असं लिहिलेलं आहे. चव्हाण यांनी ट्वीट केलेला हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर चव्हाण यांनी गंगा नदीत वाहून येत असलेल्या मृतदेहांवरुनही भाजपवर जोरदार टीका केली आहे. एक फोटो ट्वीट करत त्यात कोविड रुग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरुवात झाल्याचं या फोटोमध्ये म्हटलंय.
भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुनही भातखळकर यांनी राज्य सरकार आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध व्यक्त केलाय.