आज दि.१४ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा……

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक
आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अचानक आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले. त्यांच्या समवेत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि राज्य सरकारचे महाधिवक्ता हे सुद्धा उपस्थित होते. गेल्या २ ते ३ दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या आवारात लसीकरण मोहिम सुरू आहे. आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. साधारण २० मिनिटांचा हा दौरा पूर्वनियोजित होता असेही मुख्यमंत्री कार्यालयाने म्हट आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच, लसीकरणाबाबत माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे.

आणि राज्यात आम्ही माशा
मारायच्या : फडणवीस

मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यासोबतच केंद्रानं ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार? असं फडणवीस म्हणाले आहेत.

रशियाची स्पुतनिक-व्ही लसच्या
दोन्ही डोससाठी १९९८ रुपये लागणार

कोरोनाविरोधातील लढाईत भारताला लशीच्या स्वरूपात तिसरे शस्त्र आठवड्याभरात मिळण्याची शक्यता आहे. रशियाची स्पुतनिक-व्ही लस भारतात अगोदरच पोहोचली असून येत्या आठवड्यात ती आपल्याला उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे नीती आयोगाच्या आरोग्य समितीचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे. रशियाहून आलेल्या मर्यादित लसीची विक्री उपलब्ध होणार आहे. जुलैपासून भारतात स्पुतनिक लशीचे उत्पादनही सुरू करण्यात येणार आहे. स्पुतनिक लसीची किंमत रेड्डीज लॅबने जाहिर केली असून या लसीचा एक डोस भारतीयांना ९९९ रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच, दोन्ही डोससाठी भारतीयांना १९९८ रुपये मोजावे लागणार आहेत.

दोन्ही डोसचे लसीकरण
वर्षभरात पूर्ण करणार

भारतात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस या वर्षी अखेरपर्यंत देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत डोसच्या उपलब्धतेबाबत केंद्राकडून एक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जुलैपर्यंत देशात एकूण ५१.६ कोटी डोस उपलब्ध करण्यात येणार आहेत. यातील १७ कोटी डोस यापूर्वीच देण्यात आले आहेत. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोसचे उत्पादन करण्यात येणार आहे. देशातील १८ वर्षांवरील वयाच्या जवळपास ९५ कोटी लोकांच्या दोन्ही डोस अधिक हे उत्पादन असेल.

अभिनेत्री हुमा कुरेशी बांधणार
१०० बेडचे तात्पुरते कोविड रुग्णालय

कोरोना विरोधातील लढाईत समाजातील प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देतो आहे. मग, बॉलीवूड सेलिब्रिटी यात कसे मागे राहतील? अभिनेत्री हुमा कुरेशी हिने देखील या लढाईत उडी घेत दिल्लीत १०० बेडचे तात्पुरते कोविड रुग्णालय बांधण्याचे ठरवले आहे. या कामासाठी हुमा ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या एनजीओची मदत घेणार आहे. तसेच यासाठी फंड उभारण्यासाठी तिने मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला ‘ब्रीद ऑफ लाइफ’ असे नाव देण्यात आले आहे.

नेपाळमध्ये राजकीय घडामोडी,
मध्यरात्री पंतप्रधानांची नियुक्ती

नेपाळमधील प्रमुख विरोधी पक्ष नेपाळ काँग्रेस, तसेच सरकारपासून विभक्त झालेल्या पुष्प कमल दहल-प्रचंड यांच्या नेपाली कम्युनिस्ट पक्षाकडून देशात सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सफल होऊ शकले नाहीत. कारण गुरुवारी रात्री राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी के. पी. शर्मा ओली यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नेमले. देशाच्या राज्य घटनेत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला. नाट्यमय घडामोडीत ओली यांचे विरोधक तीन दिवसांच्या कालावधीत बहुमताची व्यवस्था करू शकले नाहीत.

लशीच्या उत्पादनासाठी इतर
कंपन्यांनाही प्राधान्य देणार

कोवॅक्सिन लशीचे भारतात उत्पादन झाल्यामुळे तिच्या उत्पादनासाठी एपीआयची समस्या उद्भवणार नाही. या संशोधनात सहकारी कंपन्या आवश्यकतेनुसार पुरवठ्यासाठी सक्षम आहेत. १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपल्सिव्ह लायसेंसिंगच्या माध्यमातून दुसऱ्या कंपन्यासुद्धा कोवॅक्सिनच्या उत्पादनाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनेक राज्यांतर्फे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. लसीचे उत्पादन करण्याची क्षमता असेल तर त्यांनी परवानगीसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तूरुंगांमधील कैद्यांवर उपचार
करण्याची परवानगी द्या

देशामधील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तूरुंगांमधील कैद्यांनाही मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होताना दिसत आहे. मात्र याच रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी मागण्यासाठीचा अर्ज तिहार तुरुंगामध्ये कैदेत असणाऱ्या एका डॉक्टरने केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असणाऱ्या अल कायदाचा सदस्य असून दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याच्या आरोपांखाली हा अर्ज करणारा डॉक्टर तुरुंगामध्ये आहे. दिल्ली सत्र न्यायालयामध्ये अर्ज करणाऱ्या या डॉक्टरचं नाव सबील अहमद असं आहे. सबीलकडून दाखल आलेल्या याचिकेवर उद्या १५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

कुठून हे नग मिळतात…?
आव्हाड यांची टीका

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी करोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. “हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी ट्विटरला त्रिवेंद्र रावत यांचा व्हिडीओही शेअर केला आहे.

गोव्या मुख्यमंत्र्यांच्या
विरोधात तक्रार दाखल

करोना दुसऱ्या लाटेत गोव्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच ऑक्सिजन अभावी करोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरलं आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गेल्या ४ दिवसात या रुग्णालयात ७४ रुग्णांनी जीव गमावला आहे.

जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या
नियुक्तीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत वाद

महाविकास आघाडी सरकारच्या रुपानं 3 पक्षांची मोट बांधून राज्यात सत्तास्थापना झाली. महाविकास आघाडी सरकारला आता दीड वर्ष होत आली आहेत. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिली ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याचंही सांगितलं जातंय. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे म्हणजे शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केलीय. जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका, असं मत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय.

नव्या स्ट्रेनबाबत अनेक चिंता

सर्वात वेगाने फैलावणाऱ्या कोरोनाच्या बी १.६१७ या स्ट्रेनबाबत अनेक चिंता समोर येत आहेत. हा स्ट्रेन वेगाने फैलावत असून, आजार आणखी घातक होत आहे. सध्याच्या लसीने हा संसर्ग पूर्णपणे थोपवला जाऊ शकणार नाही, असे संकेत यावर सुरू असलेल्या संशोधनावरून मिळाले आहेत. सायन्स जर्नल नेचरकडून प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आलेला आहे.

लसीकरण उत्सवात लस
कमी आणि पोस्टर जास्त

वांद्रे पूर्व भागातील शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात लस कमी आणि पोस्टर जास्त दिसत आहेत, अशी टीका काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी करत शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. त्यापूर्वी वांद्रे पूर्व भागातील लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरून त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. लसीकरणावरून रंगलेल्या राजकारणामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

राज्यातील शिक्षक
भरती लांबणीवर

सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरभरतीमध्ये दिलेलं मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यातील शिक्षक भरती लांबणीवर पडली आहे. राज्य सरकाचे नवे आदेश आल्याशिवाय शिक्षक भरतीची प्रक्रिया केली जाणार नाही अशी माहिती आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या लेखा व कोषागार विभागातील लिपीक आणि लेखापाल भरतीवर देखील परिणाम होणार आहे.

अरबी समुद्रात
चक्रीवादळ धडकणार

येत्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. या दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘शार्ली हेब्दो’ मासिकाने केला
हिंदू देवतांचा अवमान

फ्रान्सचं मॅगझिन ‘शार्ली हेब्दो’ पुन्हा एकदा नव्या वादात सापडलं आहे. या मॅगझिनने कोविडच्या संकटावरून हिंदू देवी-देवतांचा अवमान केला आहे. त्यामुळे सोशल मीडियातून या मॅगझिनविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘शार्ली हेब्दो’ने एक कार्टुन प्रसिद्ध केलं होतं. त्यात भारतात ऑक्सिनजचा तुटवडा असल्याबद्दल टीका केली होती. 28 एप्रिल रोजी हे कार्टुन प्रकाशित करण्यात आलं होतं. भारतीय ऑक्सिजनसाठी तडफडत असल्याचं या कार्टुनमध्ये दाखविण्यात आलं होतं. त्यात हिंदू देवी-देवतांचीही खिल्ली उडवण्यात आली होती.

यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान
साहा दुसऱ्यांदा करोना पॉझिटिव्ह

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा दुसऱ्यांदा करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. आयपीएल २०२१ दरम्यान साहाला करोनाची लागण झाली. सुमारे दोन आठवडे क्वारंटाइन राहिल्यानंतरही त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.