मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आणि ओबीसींसाठी जाहीर केलेल्या सवलतीही लागू करा, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी केली आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण व रोजगारासाठी सवलती मिळणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने राबवलेले ‘जे ओबीसींना ते मराठ्यांना’, हे सूत्र अंमलात आणावे. त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. त्यापैकी अण्णासाहेब पाटील महामंडळाला एक हजार कोटी रुपये द्यावेत व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करावी. सारथी संस्थेला पाचशे कोटी रुपये द्यावेत. मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थीनींची निम्मी फी भरण्यासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा करण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दोन वर्षे ओबीसींप्रमाणे सवलती दिल्या. मराठा समाजातील मुलामुलींची विविध अभ्यासक्रमांची निम्मी फी भरण्यासाठी दोन वर्षात 1200 कोटी रुपये खर्च केले. सारथी संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. त्याचा लाभ त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी झाला. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 14 हजार तरूण तरुणींना 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिल्यामुळे त्यांचे व्यवसाय उभे राहिले व त्यांनी अनेकांना रोजगार दिले. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेतून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात प्रति महिना 2 हजार तर शहरी भागात प्रति महिना 3 हजार रुपये सुरू केले व त्याचा लाभ अनेकांना झाला. चांगल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची लाखो रुपये फी भरली. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारनेही आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण व रोजगारासाठी मदत केली पाहिजे व त्यासाठी 3 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, असं ते म्हणाले.
घटनेच्या 102 व्या दुरुस्तीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अनुकूल निकाल आला आणि राज्याचा आरक्षणाचा अधिकार कायम राहिला तरीही सर्वोच्च न्यायालयात ज्याच्या आधारे मराठा आरक्षण नाकारले असे मागासलेपणा व पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी असाधारण स्थिती हे अन्य दोन मुद्दे उरतात. न्यायालयाने गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला असल्याने मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नव्याने घ्यावा लागेल व त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे उपस्थित केले त्यावर उत्तर असावे लागेल. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने मराठा आरक्षणाबाबत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ताबडतोब राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करून मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत पुन्हा सर्वेक्षण आणि अभ्यास सुरू केला पाहिजे. असा अहवाल आल्यानंतरच राष्ट्रीय मागासवर्ग आयोग व राष्ट्रपतींच्या मंजुरीने राज्याला पुन्हा कायदा करता येईल, असंही त्यांनी सांगितलं.