अत्यंत चुरशीची वाटणारी पण सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने एकहाती जिंकलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीनंतर, आता अध्यक्षपदाची निवड झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. विश्वास पाटील हे अनुभवी संचालक आहेत. महत्त्वाचं म्हणजे गोकुळ निवडणुकीच्या अगोदर त्यांनी महाडिक गटातून सतेज पाटील यांच्या गटात प्रवेश केला होता.
गोकुळमधील महाडिकांची तीन दशतकांची सत्ता उलथवण्यात, सत्तातंर करण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात होता. त्यामुळेच मोठा वाटा उचलल्याचं बक्षीस म्हणून विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात चुरस होती. अखेर विश्वास पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.
गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव एमआयडी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कमोर्तब झाले.
गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक गटाच्या तब्बल तीन दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने सुरुंग लावला. 4 मे रोजी झालेल्या मतमोजणीवेळी गोकुळच्या एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले. तर सत्ताधारी महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले. गोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला.