नांदेड-कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र केवळ पर्यवेक्षण व रुटीन तपासणीसाठी मुंबई येथील पथक येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी पत्रकारांना बोलताना दिली आहे. खासदार राजीव सातव मागील आठवड्यातच हिंगोली येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा व रुग्णांची परिस्थिती याची सविस्तर चौकशी केली होती. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहितीही त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन घेतली होती. त्यानुसार त्यांनी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे हिंगोली जिल्ह्यातील सुविधांबाबत कळविले होते.
प्रकृती चिंताजनक नाही
खासदार राजीव सातव यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे वृत्त काही माध्यमांवर देण्यात आले आहे. तसेच त्यांना मुंबईत हलवले जाणार असेही सांगितले जात आहे. एवढेच नव्हे, तर सोशल मीडियावर सुद्धा अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यांना मुंबईत हलवले जाणार नाही. सोबतच, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे.
पुण्यात घेत आहेत उपचार
दरम्यान त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही दूरध्वनीवरून विचारणा केली. या सोबतच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहिलोत, यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली जात आहे. तसेच राज्यमंत्री विश्वजीत कदम पुण्यात ठाण मांडून आहेत.
शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सर्व आरोग्य सुविधांवर लक्ष ठेऊन आहेत. खासदार सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्यांना मुंबई येथे हलविले जाणार नाही. मात्र मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल ची पथक त्यांची तपासणी करण्यासाठी येणार आहेत. त्यांची तपासणी केवळ रूटीन तपासणी असल्याचेही स्पष्ट केले. खासदार सातव लवकरच बरे होतील असा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे…!
राजकिरण देशमुख,नांदेड