दूरदर्शनवर १९८७ साली ‘रामायण’ ही अध्यात्मिक मालिकेत सीतेची भूमिका अभिनेत्री “दीपिका चिखलिया” यांनी साकारली होती. या मालिकेत सीता माईची भूमिका त्यात विशेष लक्षवेधी ठरलेली पाहायला मिळाली कारण अवघ्या १६ ते १७ वयातच या अभिनेत्रीने रसिकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ९०च्या दशकात दीपिका इतकी लोकप्रिय अभिनेत्री होत्या की त्यांना पाहून लोकं आशिर्वाद घेण्यासाठी पळत त्यांच्या जवळ पोहोचायचे.
‘रामायण’ या मालिके व्यतिरिक्त त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं होतं. त्याकाळी त्यांची तुफान क्रेझ होती. ‘रामायणा’ नंतर दीपिका ‘स्वार्ड ऑफ टीपू सुलतान’ आणि ‘विक्रम और वेताल’ या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली होती. रामायण मालिकेमुळे त्यांना बॉलिवूडचे काही निवडक चित्रपट साकारण्याची संधी मिळाली. घर का चिराग, रुपये दस करोड या दोन चित्रपटात त्यांनी काम केले परंतु मालिकेतील सीतेच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी त्यांना इथे स्वीकारले नाही. दीपिका यांनी उद्योगपती हेमंत टोपीवालासोबत लग्न केले. हेमंत आणि दीपिकाच्या लग्नात बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना यांनी देखील हजेरी लावली होती. लग्नानंतर दीपिका यांनी इंडस्ट्रीला रामराम ठोकला. दीपिकाच्या पतीची कॉस्मेटिक कंपनी आहे. लग्नानंतर दीपिका पतीच्या कंपनीत काम करू लागल्या. त्यांना निधी आणि जुही नावाच्या दोन मुली आहेत. २०१७ साली पुन्हा नव्याने त्या छोट्या पडद्याकडे वळाल्या एका गुजराथी शो “छुटा छेडा” मध्ये त्या दिसल्या. दीपिका चिखलिया यांनी राजकारणातही आपला हात आजमावला आहे. १९९९ मध्ये गुजरातमधील बडोदा येथून त्या भाजपच्या तिकीटावर लोकसभेत पोहोचल्या होत्या आणि बडोद्याचे खासदारपदही भुषविले होते. दीपिका चिखलिया यांनी राज किरण सोबत ‘सुन मेरी लैला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यांनी अनेक गुजराती, बंगली, तामिळ सिनेमेही केले आहेत. राजेश खन्नासोबतही त्यांनी तीन चित्रपटही केले आहेत. १९९४ मध्ये दीपिका ‘खुदाई’ या हिंदी चित्रपटात शेवटची दिसल्या होत्या. आता टीव्हीवर नाही तर चित्रपटातून त्यांनी कमबॅक केले आहे. ‘गालिब’ या चित्रपटात दीपिका चिखलिया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या आहेत. अफजल गुरूचा मुलगा गालिब गुरु याच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका चिखलिया यांनी आयुषमान खुरानाच्या बाला चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी यामी गौतमीच्या आईची भूमिका साकारली होती.
रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका लॉकडाउनमुळे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. अनेक वर्षांनंतर आजही या मालिकेची लोकप्रियता टिकून आहे. ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “जेव्हा मालिका सुरू झाली होती, तेव्हा मी अवघी पंधरा वर्षांची होते. त्यावेळी या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की पुढे जाऊन ही मालिका एक वेगळाच इतिहास रचणार आहे.” शूटिंगबद्दल सांगताना त्यांनी पुढे म्हटलं, “रामचरितमानसमध्ये तुलसीदास यांनी राम आणि सीता यांच्या वेशभूषेचं वर्णन केलं होतं. आम्हाला त्याच प्रकारे वेशभूषा करायची होती. टेलिव्हिजनवर पहिल्यांदा रामायण पाहिलं जात होतं. त्यावेळी टीव्हीवर काम करण्याला फार काही महत्त्व नव्हतं.”
या मालिकेचा पहिला एपिसोड एक तासाचा होता आणि त्या एक तासाच्या शूटिंगसाठी तब्बल १५ दिवस लागले होते. शूटिंगसाठी सर्व कलाकार महिन्यातील २७ दिवस तिथेच राहायचे. सेटवरच मेकअप स्टुडिओ असायचा. शूटिंग झाल्याशिवाय कोणीच मुंबईला परतायचे नाही, असं त्यांनी सांगितलं.
“सहा महिन्यांतच आपण खूप मोठे स्टार झालो होतो, याची जाणीव झाली होती. त्यावेळी राम आणि सीता या भूमिका एखाद्या महाराजा आणि महाराणीसारख्या समजल्या जायच्या. आम्ही जगभरात मालिकेला प्रमोट केलं होतं. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आमचा सत्कार करण्यासाठी दिल्लीला बोलावलं होतं. त्यावेळी टीव्ही म्हणजे एक धार्मिक स्थळ भासत होते आणि दर रविवारी सकाळी लोक त्यापुढे जमायचे. आम्ही जिथेही जायचो, तिथे लोक आमच्या पाया पडू लागले”, अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला.
संजीव वेलणकर , पुणे