काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती… याचा प्रत्यय मनमाड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आला. धावती गाडी सोडत असतांना एक साधू थेट रुळावर जाऊन पडला ते पाहून उपस्थितांनी डोळे बंद केले त्यांना वाटलं की साधू गाडी खाली सापडून काही वाईट घडलं असावं. पण दैव बलवत्तर….
हा साधू रुळांच्या मधोमध पडला होता. दुसऱ्या बाजूच्या लोकांनी त्याला पाहिल्यानंतर तसंच पडून राहण्याच्या त्याला जोरात ओरडून सूचना देण्यात आल्या. कोणतीही हालचाल करू नको, डोके वर काढू नको असा सल्ला इतर प्रवाशांनी दिला. त्यानुसार साधू तसाच झोपून होता. त्याच्या अंगावरून 6 ते 7 डबे गेले. अखेर गाडी थांबली आणि साधू सहीसलामत बाहेर आला.
अंगावर शहारे आणणारा हा सर्व थरार एका वेंडरने त्याच्या मोबाइलमध्ये कैद केला असून साधूचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्याला जीवदान मिळाले. धावत्या गाडीतून उतरु नये किंवा चढण्याच्या प्रयत्न करु नये अशा सूचना अनेकदा देण्यात येत असतात मात्र, असे असतानाही प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात आणि अपघात होण्याच्या घटना समोर येतात.
भुसावळमध्येही घडला असाचा प्रकार
भुसावळ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सात वरून डाउन पाटलीपूत्र एक्सप्रेस सकाळी सातला रवाना झाली. त्यादरम्यान एका प्रवाशाने चालत्या गाडीतून बँग प्लॅटफॉर्मवर फेकून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रवाशी गाडीतून प्लॅटफॉर्मवर पडून रेल्वे गाडीच्या गॅप मध्ये जाऊन पडला. यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असणारे रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उप निरीक्षक दीपक कवले आणि पोलीस महेश तायडे यांनी तत्काळ धाव घेऊन रेल्वे गाडीच्या गॅप मध्ये पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविले.
प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर बसवून विचारपूस केली असता प्रवाशाने मुकेश कैलाश चौधरी, वय 18 राहणार भालोद असे सांगितले. प्रवाशाला पाटलीपूत्र एक्सप्रेसने नाशिक जायचे होते. पण चुकीने डाउन गाडीत बसल्याने चालत्या गाडीतून उतरतांना ही घटना घडली. यावेळी रेल्वे प्लेटरफॉर्मवर कर्तव्यावर असणारे रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकारी व कर्मचारी देवदूत बनून प्रवाशांचे प्राण वाचविला.