आज दि.६ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सर्वोच्च न्यायालयाने
केंद्र सरकारला फटकारले

आज भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण, न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नागेश्वर राव या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमोर झालेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. तसेच, “तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहात आहात. आम्ही दिलेल्या निर्णयांना तुमच्या लेखी अजिबात किंमत नाहीये का?” असा खरमरीत सवाल करत “आता आमच्याकडे तीनच पर्याय शिल्लक राहिले आहेत”, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाच्या या तीन सदस्यीय खंडपीठाने केंद्र सरकारवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले आहेत.

गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा,
मोर्चे त्वरित स्थगित करा : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्ष आणि संघटनांना विनंती केली आहे. “मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता. मात्र आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या.”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे.

गणेशोत्सवासंबंधी नियमावली
जाहीर केली जाणार

गणेशोत्सवावरही करोना संकट असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आपत्ती व्यवस्थापनासंबंधी बैठक घेतली. गणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती बैठकीत सहभागी झालेले राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

राज्यात पुढील चार दिवस
पावसाचा जोर वाढणार

राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सांगली सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठी माणूस हरल्याबद्दल तुम्ही पेढे
वाटताय, लाज नाही वाटत तुम्हाला?

बेळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यामध्ये भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, त्याच वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा मात्र मोठा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपाकडून आनंद व्यक्त केला जात असताना शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना महाराष्ट्रातील भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. “बेळगावमध्ये मराठी माणूस हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटताय, लाज नाही वाटत तुम्हाला?” असा सवालच राऊतांनी भाजपाला केला आहे.

मुंबई शेअर बाजारची
५८ हजार २८९.६१ पर्यंत मजल

आज दिवसभराचे व्यवहार झाल्यानंतर दुपारी मुंबईतील शेअर बाजार बंद होत असताना सेन्सेक्सनं आत्तापर्यंतची सर्वाधिक अर्थात ५८ हजार २८९.६१ पर्यंत मजल मारली आहे. दिवस सुरू झाला तेव्हा मोठी उसळी घेणारा सेन्सेक्स काही तासांनी स्थिर झाला आणि शेवटी १६७ अंकाची भर घालत थांबला. यावेळी निफ्टीनं देखील विक्रमी कामगिरी करत पहिल्यांदाच १७ हजार ४०० अंकांचा टप्पा पार केला आहे.

नीट परीक्षा पुढे ढकलण्याची
मागणी, याचिका फेटाळली

१२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयात NEET UG परीक्षा २०२१ दुसऱ्या तारखेला घेण्याबाबत मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने म्हटले होते की NEET परीक्षेचे तारीख सीबीएसई कंपार्टमेंट व अन्य परीक्षेचा तारखा सारख्या आहेत.

१५ सप्टेंबरला होणार अवकाश
पर्यटनाला सुरुवात

स्पेस एक्स कंपनी अवकाश पर्यटनाला सुरुवात करत आहे. येत्या १५ सप्टेंबरला चार नागरीक स्पेस एक्सच्या ‘अवकाश कुपी’तून ३ दिवसांच्या अवकाश सफरीकरता रवाना होणार आहेत. Inspiration4 असं या मोहिमेचे नाव असणार आहे. अमेरिकेतील अब्जाधीश जरेड इसाकमॅन हे या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत.

गीतकार जावेद अख्तर यांच्या
घराबाहेरील सुरक्षा वाढवली

प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपाने अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अख्तर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आल्याचं कळतं. काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केलेली त्याच पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.