बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘आर्या’ (Aarya 2) या सीरीजद्वारे डिजिटल क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकण्यात अभिनेत्री यशस्वी ठरली. ‘आर्या’चा पहिला सीझन खूपच धमाकेदार होता, त्यानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आज (10 डिसेंबर) ‘आर्या’चा दुसरा सीझन रिलीज झाला आहे. यात एकूण 8 भाग आहेत. ‘आर्या 2’ ची कथा तिथूनच सुरू होते, जिथे पहिला सीझन संपला होता.
‘आर्या सीझन 2’ तिथून सुरू होतो, जेव्हा सुष्मिता तिच्या मुलांच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या देशात जाण्याचा निर्णय घेते. पण तिथेही ते सुरक्षित नाहीत. नंतर, वडिलांविरुद्ध साक्ष देण्यासाठी आणि सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन देत आर्याला भारतात आणले जाते. मात्र, आर्याने कोर्टात केलेल्या आपल्या वक्तव्यावरून माघार घेतली. त्यामुळे पोलीस आयुक्त तिला मदत करण्यास नकार देतात. तर, रशियन माफियाही आर्याच्या मागे लागतात, कारण त्यांना वाटते की आर्यकडे 300 कोटींच्या ड्रग्ज चोरीची माहिती आहे. पण ती तिने लपवून ठेवली आहे. एकीकडे त्याचे कुटुंब आर्याचा बदला घेण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे रशियन माफियाही तिला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत ती आपल्या कुटुंबाशी कशी भांडणार आणि आपल्या तीन मुलांना कशी वाचवणार, याच वळणावर हा सीझन संपतो.
दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता म्हणजेच आर्या हळूहळू सर्व कमांड आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेते. सुष्मिताने या सीझनमध्ये दमदार अभिनय केला आहे. आपल्या व्यक्तिरेखेतील कमकुवतपणा आणि ताकद तिने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली आहे. जसजशी कथा पुढे जाईल तसतसे लोकांना बरेच ट्विस्ट्स पाहायला मिळतील. मात्र, सस्पेन्स जसजसा उघडेल, तसतशी लोकांची उत्सुकता आणखी वाढणार आहे. सीरीजची स्क्रिप्ट खूप छान लिहिली आहे. कथा पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.
‘कमज़ोर हम नही, वक्त होता है’ सुष्मिताचे असे काही डायलॉग्स जबरदस्त आहेत. याशिवाय ‘मै डॉन नही हूं, मै बस एक वर्किंग मदर हूं’. या सीरीजमध्ये सुष्मिताही दमदार स्टंट करताना दिसत आहे. याशिवाय बाकीच्या पात्रांनीही छान काम केले आहे. मात्र, मालिकेच्या शेवटच्या भागात तुम्हाला काही प्रश्न पडतील, ज्यासाठी तुम्हाला तिसर्या सीझनची वाट पाहावी लागेल. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे सुष्मिताचा दमदार परफॉर्मन्स आणि सीरीजचा क्लायमॅक्स दोन्ही पाहण्यासारखे आहेत.