नवनीत राणा आणि रवी राणा यांची न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र तुरुंगात रवानगी होताच नवनीत राणा यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.
नवनीत राणा यांना भायखळा कारागृहात ठेवण्यात आले आहे. यावेळेस त्यांचं चेकअप करण्यात आलं. चेकअप दरम्यान नवनीत यांचा ब्लड प्रेशर वाढल्याचं समोर आलं. त्यामुळे नवनीत यांना कारागृहातील रुग्णालयात दाखल केल्याचं समजतंय. तसंच नवनीत यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान दुसऱ्या बाजूला रवी राणा यांना घेऊन पोलीस तळोजा कारागृहात पोहचले. रवी राणा यांना घेऊन येत असल्याचं समजताच तळोजा कारागृहाबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. राणा पती-पत्नी विरोधात शिवसैनिक घोषणाबाजी करत होते. शिवसैनिक आक्रमक झालेले होते. त्यामुळे पोलिसांनी कोणताही अपप्रसंग घडू नये, याची खबरदारी घेत कारागृहाबाहेर मोठा फौजफाटा तयार ठेवला होता. आतापर्यंत काय झालं? चिथावणीखोर वक्तव्य केल्याने राणा पती-पत्नी विरोधात पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राणा दाम्पत्याला न्यायालयासमोर उभं करण्यात आलं. न्यायालयाने या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयानंतर दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर राणा पती-पत्नीची तळोजा आणि भायखळा कारागृहात रवानगी करण्यात आली. या दोघांना आता 14 दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत.