कोरोनामुळे अनेकांचं आयुष्य बदलून गेलं आहे. या महाभयंकर आजाराने नागरिकांना त्यांची लाईफस्टाईलच बदलायला भाग पाडलं आहे. अनेकांनी तर हेल्दी खाण्यावरच भर दिला आहे. आपल्या आहारातून फास्ट फूड आणि मैद्यापासून बनविण्यात आलेले पदार्थच घेणं बंद केलं आहे. मार्केट रिसर्च फर्म मिंटेल इंडिया कन्झ्यूमरने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब उघड झाली आहे.
ब्राऊन राइस आणि ऑर्गेनिक फळांचा आपल्या आहारात समावेश केल्याचं 52 टक्के नागरिक सांगतात. तर, कोरोना येण्यापूर्वी हे पदार्थ कधी तरी खात होतो असं 50 टक्के लोकांचं म्हणणं आहे. तर 55 टक्के नागरिक खाण्यापिण्यात बदल करून आपली इम्युनिटी वाढवण्यावर भर देत आहेत, असं या सर्व्हेक्षणातून दिसून आलं आहे.
कोरोना काळात नागरिकांनी फिजिकल अॅक्टिव्हिटीला प्राधान्य दिलं आहे. संशोधनानुसार, 512019च्या तुलनेत 2020मध्ये आठवड्यातून तीनदा व्यायाम करण्यास सुरूवात केल्याचं 51 टक्के भारतीयांनी सांगितलं. ब्रिस्क वॉकिंग आणि योग सुरू करण्यात आला आहे. तर 57 टक्के लोकांनी जॉगिंग आणि सायकलिंग सुरू केल्याचंही या संशोधनातून निष्पन्न झालं आहे.
2020 मध्ये लोकांनी आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल केला आहे. त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर पडला आहे. मेडिटेशन करणाऱ्या 20 पैकी 9 लोकांची निद्रानाशाची समस्या सुटली आहे. त्यांचा ताणतणावही कमी झाला आहे. ते पूर्वीपेक्षा आता स्वत:ला अधिक उत्साही समजत आहेत, असंही हे रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
या महामारीने लोकांना आरोग्याची काळजी घेण्यास प्रवृत्त केलं आहे. भारतीय लोकं शारिरीक कसरतीसह खाण्यापिण्यावरही लक्ष देत आहेत. लाइफस्टाईलमध्ये बदल होत असल्याने आता कंपन्याही हेल्दी फूड आणि डिंक्स उपलब्ध करून देताना दिसत आहे, असं मिंटेल इंडिया कन्झ्यूमरच्या कंटेट हेड निधी सिन्हा यांनी सांगितलं. संशोधनानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये महिला अग्रेसर आहेत. आपली इम्युनिटी वाढवणाऱ्याकडे ध्यान ठेवणाऱ्यांमध्ये 50 टक्के महिला आहेत. तर 48 लोक जाहिराती आणि सोशल मीडियावरील कॅम्पेन पाहून निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असल्याचंही या संशोधनातून दिसून आलं आहे.