डॅडी या नावाने कुख्यात असलेला डॉन अरुण गवळीने 28 दिवसांच्या संचित रजेची मागणी केली आहे. कुटुंबाला भेटण्यासाठी अरुण गवळीने संचित रजा मागितली आहे. फर्लोचा अर्ज कारागृह प्रशासनाने नामंजूर केल्यानंतर गवळीने न्यायालयात धाव घेतली आहे. अरुण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अरुण गवळीच्या पॅरोल-फर्लो रजा हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे.
कारागृह प्रशासनाने फर्लो नामंजूर केल्यानंतर अरुण गवळीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस देत तीन आठवड्यात याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. अरुण गवळी हा यापूर्वी किमान 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आल्याची माहिती आहे.
दरम्यान, अरुण गवळी काही महिन्यांपूर्वीच आजोबा झाला. त्याची मुलगी योगिता गवळी-वाघमारे आणि जावई-अभिनेता अक्षय वाघमारे यांना मुलगी झाली. त्यामुळे नातीला बघण्यासाठी अरुण गवळी सुट्टीवर येऊ इच्छित असल्याची शक्यता आहे.
अक्षय आणि योगिता यांचं लग्न गेल्या वर्षी मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं होतं. अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता.
पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणास्तव न्यायालयाने गेल्या वर्षी अरुण गवळीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार, त्याला 27 एप्रिल 2020 पर्यंत आत्मसमर्पण करायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नागपूरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी जुलै महिन्यातही अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती.
अरुण गवळीला कोरोनाची लागण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे गवळीला उपचारासाठी नागपूर मेडिकलमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले होते.