इगतपुरीमधील रेव्ह पार्टी, ‘बिग बॉस मराठी’ फेम हीना पांचाळसह 25 जणांना न्यायालयीन कोठडी

नाशिकच्या इगतपुरीमधील रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या ‘बिग बॉस मराठी’ फेम हीना पांचाळसह 25 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. काल दुपारी या सर्व संशयित आरोपींना हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 26 जून रोजी मध्यरात्री इगतपुरीतील स्काय ताज आणि स्काय लगून या दोन आलिशान बंगल्यात रंगलेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकला होता. रेव्ह पार्टी उधळून लावत ड्रग्ज, दारु, कॅमेरा आणि इतर साहित्य हस्तगत केले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी 25 जणांना अटक केली होती.
याआधी, सर्व संशयित आरोपींनी अंमली आणि मादक पदार्थ जवळ बाळगून सेवन आणि वापरल्याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात यावे असा युक्तिवाद सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने यातील तीन कामगार, एक फोटोग्राफर, एक स्वयंपाकी अशा एकूण 5 जणांना जामीन मंजूर करत उर्वरीत आरोपींना एका दिवसाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले होते.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी 3 बंगले सील केल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आठवड्याभरापूर्वी (शनिवार 26 जून) मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती.

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम त्या बंगल्यावर दाखल झाली.

पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत असलेले 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं होतं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तसेच पोलिसांनी स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतलं. अटक झालेल्या व्यक्तींमध्ये ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळचा समावेश आहे. याशिवाय इटालियन महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, बॉलिवूडच्या दोन महिला कोरिओग्राफर यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

अभिनेत्री मलायका अरोराची लूक-अलाईक अशी ख्याती मिळवलेली डान्सर हीना पांचाळ ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. मात्र महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपला होता. हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत ती अनेक ‘आयटम साँग्ज’मध्ये झळकली आहे. ‘मुझसे शादी करोगे?’ या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. हीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआउट करतानाचे केलेले व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध आहेत. हीनाचे अनेक टीकटॉक व्हिडीओही व्हायरल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.