गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना हटवून भाजपानं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलंय. पण सोबतच मुख्यमंत्रीपदाचा नेता निवडतानाही भाजपा आणखी एखादा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. कारण ज्यांची नावं चर्चेत आहेत त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा नेता भाजपा देऊ शकतं अशीही जोरदार चर्चा आहे. भाजपच्या आमदारांची आज बैठक आहे. त्यातच भाजपचा सभागृह नेत्याची निवड होईल. तो मुख्यमंत्री म्हणून शपथ घेईल. म्हणजेच पुढच्या काही तासात गुजरातमध्ये राजकीय घडामोडी झपाट्यानं घडतील आणि नवा मुख्यमंत्रीही निश्चित होईल.
गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळी नावं चर्चेत आहेत. त्यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, पुरुषोत्तम रुपाला, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, उपमुख्यमंत्री राहीलेले नितीन पटेल यांचाही समावेश आहे. पण ही चर्चेत असलेली नावं आहेत. सीआर पाटील यांनी मात्र आपण अशा कुठल्याच रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट केलंय. एक नाव मात्र आश्चर्यकारकपणे चर्चिलं जातंय आणि ते आहे लक्षद्वीपचे लेफ्टनंट गव्हर्नर प्रफुल्ल पटेल यांचं. त्यांना पक्षानं अहमदाबादलाही पोहोचायला सांगितलंय. त्यामुळे चर्चेत असलेल्या नावांपेक्षा पूर्णपणे एखादा नवा चेहराच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी दिसू शकतो याचाच कयास लावला जातोय. पण हा नेता पाटीदार समाजातूनच असेल असा अंदाज अनेक जण लावतायत.
मुख्यमंत्री रुपाणींना हटवताना गुजरातमध्ये अगदी सामान्य घडामोडी सुरु होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मध्ये विश्व पाटीदार समाजाच्या सरदार धामचे लोकार्पण केले. वातावरण सगळं उत्सवी होतं. पण भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री बीएल संतोष अचानक गांधीनगरला पोहोचले आणि त्यांनी प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि प्रदेश प्रभारी रत्नाकर यांच्यासोबत बैठक केली. त्यानंतर मात्र वातावरण अचानक बदललं. विजय रुपाणी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना सोबत घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेले. त्यांची ही भेट म्हणजे मंत्रीमंडळ विस्तार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली पण राज्यपाल भेटीनंतर रुपाणी पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. पक्षाचे आभार मानले. त्यांचं वय 65 वर्ष आहे. त्यामुळे ते इतक्यात निवृत्त होतील असं नाही. पक्ष जो कुठली जबाबदारी देईल ते पार पाडेन असं सांगायला रुपाणी विसरले नाहीत.
जवळपास वर्षभरात भाजपनं हा चौथा मुख्यमंत्री बदलेला आहे. गुजरातमध्ये पुढच्या दीड वर्षात विधानसभेच्या निवडणुका आहेत. दोन दशकाहून अधिक काळ भाजपची गुजरातमध्ये सत्ता आहे. त्यामुळे भाजपविरोधी वातावरण असल्याची चर्चा आहे. त्यात कोरोनाच्या काळात रुपाणी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचाही ठपका ठेवण्यात आलाय. तसच रुपाणी हे लाईमलाईटपासून थोडं दूर राहून, कसलाही प्रचार न करता काम करण्याची त्यांची पद्धत हिच त्यांच्याविरोधात गेल्याचीही चर्चा आहे. त्यातच पाटीदार समाजही नाराज असल्याचं सांगितलंय जातंय. गुजरातमध्ये मागच्या वेळेस काँग्रेसनं जोरदार टक्कर देत भाजपला 99 च्या फेऱ्यात अडकवलं होतं. त्यामुळे आता कुठलाही धोका नको म्हणून नवीन चेहऱ्यावर डाव टाकला जातोय. विशेष म्हणजे मागच्या वेळेसही आनंदीबेन पटेल यांना हटवून रुपाणींना मुख्यमंत्री केलं होतं.