संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मनोहरमामा ऊर्फ मनोहर भोसलेला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बारामती न्यायालयाने मनोहरमामाला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बारामती सत्र न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मनोहरमामाचा गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम राहणार आहे. त्याच्यावर फसवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होते. त्यामुळे बारामती पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी सत्र न्यायालयात हजर केले असता ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) या 23 वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली होती. 20 ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडिलांचा थायरॉईड आणि कर्करोग बरा करतो, असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भीती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान मनोहर भोसले विरोधात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी घेतली आहे. फसवणूक प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर. त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली होती.