भारतात कोरोनाच्या वेगाने वाढत असलेल्या प्रकरणांमुळे स्थिती अनियंत्रित झालेली आहे. हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड, ऑक्सीजन आणि औषधांची कमतरता असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. तज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे की, हलकी लक्षणे असलेल्या प्रकरणांना सेल्फ आयसोलेशनमध्ये सुद्धा कंट्रोल केले जाऊ शकते. यासाठी घरात राहून आजाराची काही खास लक्षणे ओळखणे खुप आवश्यक झाले आहे.
नवी दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या काही महत्वाच्या गोष्टी आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर सुद्धा शेयर करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलकडे धाव घेण्यापेक्षा आजाराचे पूर्व संकेत ओळखावेत आणि गरज भासल्यास हॉस्पिटलमध्ये जावे.
डॉ. गुलेरिया यांनी म्हटले, होम आयसोलेशनमध्ये असाल तर सतत डॉक्टरांशी संपर्कात रहा. प्रत्येक राज्यात हेल्पलाइनची सुविधा केली आहे जिथे रूग्ण सकाळ-संध्याकाळ फोन करून माहिती मिळवू शकतो.
डॉ गुलेरिया यांनी सांगितले की, एखाद्या रूग्णाचे सॅच्युरेशन 93 किंवा यापेक्षा कमी आहे किंवा जास्त ताप, छातीत वेदनास, श्वास घेण्यास त्रास, सुस्ती किंवा इतर गंभीर लक्षण आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा हॉस्पिटलमध्ये जा. या स्थितीत रूग्णाला घरी ठेवणे योग्य नाही. अशावेळी रूग्णाला औषधे वेळेवर न दिल्यास धोका वाढू शकतो.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, रिकव्हरी रेट चांगला झाल्याने हॉस्पिटलमध्ये बेड किंवा ऑक्सीजनची समस्या बर्यापैकी नियंत्रणात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने अनेक हॉस्पिटल उघडली आहेत. ऑक्सीजनचा पुरवठा सुद्धा वाढवला आहे. अनेक ठिकाणी कॅम्प सुद्धा लावले आहेत, जिथे रूग्ण सहज जाऊ शकतात.
कोरोनाची दुसरी लाट इतक्या वेगाने आली की, देशाच्या हेल्थ केयर सिस्टमला तयारी करण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नाही. आता सर्व हॉस्पिटलबाबत गांभीर्याने काम केले जात आहे जेणेकरून जास्तीत जास्त रूग्णांवर उपचार करता येतील. रूग्णांनी देखील लक्षणे ओळखून सेल्फ आयसोलेट होण्याची आवश्यकता आहे.