साकीनाका बलात्कार, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, राज्यात संताप

साकीनाका येथे बलात्कार झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजावाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काल राजावाडीत जाऊन मी तिची माहिती घेतली होती. तिच्या आईला भेटले होते. तिच्या आईकडून माहिती घेतली होती. आज तिचा मृत्यू झाला हे अत्यंत वाईट झालं. या महिलेला दोन मुलं आहेत. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.

निर्भयाच्या घटनेनंतर कायदा बदलला, पण समाजाची मानसिकता बदलली नाही. सीसीटीव्ही आहेत, त्यात या घटना दिसल्या पाहिजे. आरोपींवर कारवाया झाल्या पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. या आरोपीने इतर एमएमआर रिजनमध्ये काही गुन्हे केलेत का हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. शक्ती कायदा डिसेंबरमध्ये येत असला तरी आरोपीवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सांगितलं. फास्ट ट्रॅक शब्दही गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे यंत्रणा अधिक वेगवान करायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली.

ही संतापजनक घटना होती. अशा घटनेवर काय प्रतिक्रिया द्याव्यात हे कळत नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत. ही घटना घडल्याने मुंबईतील तरुणी रात्री-अपरात्री सुरक्षित कशा राहतील हा खरा प्रश्न आहे. पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी घटना घडत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. नराधमांना कायद्याचा धाक राहिला नाही. आपण कठोर कायदा राबवण्यात अपयशी ठरत आहोत, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं.

साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला. कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही. त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना. नाही वाचवू शकलो तुला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

महिलेचा मृत्यू दुखद आहे. लवकरात लवकर चार्जशीट दाखल करू. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू. नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साकीनाका बलात्कार प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तिचा जबाब झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जी काही कठोर शिक्षा आहे ती केली जाईलच, पोलीस खात्याला मी यासंदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये तपास सुरु आहेय. आणखी कोणी आरोपी आहेत का त्याचाही तपास घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात. या घटनेचा वेळोवेळी अहवाल मला द्या अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

साकीनाका पोलीस देखील या प्रकरणाचा प्रत्येक प्रकारे तपास करत आहेत. काल रात्री मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः साकीनाका पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटनेची चौकशी केली. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात फक्त एक आरोपी समोर आला आहे. पोलीस संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत असले तरी पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.