मुंबई वगळता राज्यभरात नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यास परवानगी, पाहा नियमावली

नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वांनाच आता गरब्याचे वेध लागलेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे गरब्याच्या मुकलेली तरुणाई यावर्षी तरी गरबा खेळायला मिळेल याअपेक्षेत आहे. या सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नवरात्रौत्सवात गरबा यंदा रंगणार आहे. मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळण्यास सशर्त परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गरबा आयोजन करताना तसेच खेळताना नियम पाळणे बंधनकारक असल्याचंही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्या वतीने गरबा उत्सव साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी गरबा साजरा करण्याची पद्धत आहे. एक म्हणजे मोकळी मैदाने दुसरं म्हणजे सभागृहात आणि तिसऱ्या ठिकाणी म्हणजे बंद सभागृहात. खुल्या मैदानात सोशल डिस्टन्सिंग आणि फेस मास्क अनिवार्य असणार आहे.

हॉल्स किंवा ऑडिटोरिअममध्ये क्षमतेपेक्षा 50 टक्के नागरिकांनाच परवानगी असणार आहे. यासोबतच तेथे कार्यरत असलेले नागरिक, सेवा देणारे कॅटरिंगच्या व्यक्तींनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. याच संदर्भात काही मार्गदर्शक सूचना निश्चित केली असून त्याचे पालन करणे आवश्यक असणार आहे. अटी आणि शर्थींचे पालन करुनच गरबाचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे असंही राजेश टोपेंनी सांगितलं.

मुंबईत गरबा खेळण्याची परवानगी नाही

मुंबई महानगरपालिकेने नवरात्रौत्सवासंदर्भातील नियमावली जाहीर केली असून कोरोनाच्या परिस्थितीत या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

– सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाने पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन परवानगी यंत्रणा तयार करण्यात आली असून ती 23 सप्टेंबरपासून कार्यन्वित करण्यात आली आहे.

– देवीचे मंडप फार मोठे नसावेत. मर्यादित आकारमानानेच मंडळ उभारले जावेत. सजावटीतही भपकेबाज पणे नसावा.

– देवीची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट आणि घरगुती मूर्तीकरिता 2फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.

– नवरात्रौत्सवात गरब्याचे आयोजन केले जाऊ नये. तसेच आरती, भजन, कीर्तन, अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

यावर्षी आठ दिवस साजरा होणार नवरात्रोत्सव

यंदा शारदीय नवरात्रौत्सव नऊ ऐवजी 8 दिवसांचा आहे. तृतीया आणि चतुर्थी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने नवरात्रौत्सव 8 दिवसांचा असेल. आश्विन शुद्ध प्रतिपदा यंदा 7 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात होते. यंदा विजयादशमी म्हणजेच दसरा 15 ऑक्टोबर या दिवशी आहे. ज्योतिषी डॉ. श्रीराम द्विवेदी यांनी सांगितलं, की ‘या वर्षी गुरुवारी (7 ऑक्टोबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीमधील सर्व नऊ दिवस शुभ समजले जातात. या वर्षी दुर्गा माता ही पालखीमध्ये स्वार होऊन येत आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.