माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
पोलिसांकडून दोन तास चौकशी
विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याचा अहवाल फोडल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आज दुपारी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर दोन तास चौकशी देखील करण्यात आली. या चौकशीदरम्यान आपल्याला सहआरोपी करण्याचा प्रयत्न असल्यासारखे प्रश्न विचारल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या चौकशीबाबत संजय राऊतांनी केलेल्या ट्वीटवर देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी खोचक शब्दांत निशाणा साधला.
सरकारचे षडयंत्र बाहेर काढले
म्हणूनच चौकशी : देवेंद्र फडणवीस
दोन तास चौकशी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन परखड शब्दांमध्ये टीका केली. “मला नोटीस पाठवण्यामागचं कारण सभागृहात मी मांडत असलेले विषय आहेत. दाऊदसोबत सरकारच्या मंत्र्यांचं कनेक्शन किंवा विरोधी पक्षाबाबत सरकार करत असलेलं षडयंत्र हे विषय मी काढले. म्हणून अचानक अशी नोटीस मला देण्यात आली”, असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.
तर निवडणुका लगेच पण
लागू शकतील : अजित पवार
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच निवडणुका घ्याव्या लागतील असे म्हटले आहे. निवडणुकांमध्ये ओबीसींनासुद्धा प्रतिनिधित्व मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिली तर निवडणुका लगेच पण लागू शकतील. पुणे शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे व तीन सदस्यांचा प्रभाग राहणार आहे.
रशियन सैन्य पोलंडपासून
25 किलोमीटर अंतरावर
रशियाने युक्रेनमधील मारियोपोल या बंदर असलेल्या शहरावरही जोरदार हल्ला सुरु केला आहे. तसेच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रशियाने पोलंडच्या सीमेजवळ यावोर्कीव येथे युक्रेनियन सैन्यावर हवाई हल्ला केला आहे. यावोर्कीव हा प्रदेश पोलंडच्या सीमेपासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार रशियाने या ठिकाणावर आठ क्षेपणास्त्रे डागली असून अद्यापतरी जीवितहानी झालेली नसून अनेकजण जखमी झाले आहेत.
पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची
शक्यता : नितीन गडकरी
‘ईटी ग्लोबल बिझनेस समिट’ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना, गडकरी म्हणाले की, सरकार 100 टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांपासून सार्वजनिक वाहतूक चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल 20 टक्के मिसळले जाते, ज्यामुळे ते मिश्रित इंधन बनते आणि ते सामान्य पेट्रोलच्या तुलनेत अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे. गडकरी म्हणाले, ऑटोमोबाईल कंपन्यांच्या SIAM चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.
शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियो यांना
तृणमूल काँग्रेसची उमेदवारी
निवडणूक आयोगाने काल (शनिवार) चार राज्यांतील पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघ आणि बालीगंज विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी तृणमूल काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवाय, दोन्ही जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपला पक्षच जिंकेल, असा दावाही पक्षाने केला आहे. विशेष, म्हणजे या ठिकाणच्या निवडणुकीसाठी टीएमसीने भाजपाचे माजी नेते आणि मंत्री राहिलेले शुत्रघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी देऊन, मोठा डाव खेळला आहे.
श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर,
अनेक देशांचे कर्ज वाढले
श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाची परकीय चलनाची गंगाजळी जवळपास रिकामी झाली असून चीनसह अनेक देशांच्या कर्जाखाली श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. जानेवारीमध्ये श्रीलंकेचा परकीय चलन साठा ७०% ने घसरून डॉलर २.३६ अब्ज झाला आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे श्रीलंकेला परदेशातून अन्न, औषध आणि इंधन यासह सर्व आवश्यक वस्तू आयात करणे अशक्य आहे.
मध्यप्रदेशात भररस्त्यात
टोळक्याकडून तरुणीचा विनयभंग
मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एक लाजिरवाणा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही तरुण एका मुलीचा विनयभंग करत आहेत. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी झालेल्या भगोरिया महोत्सवामधील आहे. आदिवासीबहुल अलीराजपूरच्या बालपूर गावात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका मुलीवर काही मुलांनी धावून जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
SD social media
9850 60 35 90