आज दि.२ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

नौदलाच्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छटा : CM शिंदे म्हणाले, “हे महाराजांना अभिवादन”

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री या संदेशात हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रांत युद्धनौका आणि भारतीय नौदलास नवीन ध्वज प्रदान करणे हा भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि सुवर्ण असा क्षण आहे. थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी दुणावले आहे. बलशाली, आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यासाठी भारतीय सेनेच्या सर्व दलांचे अभिनंदन आणि भारतमातेच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या सर्व शूरवीरांना मनापासून शुभेच्छा आणि मानाचा मुजरा,’ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू प्यायल्याने मृत्यू; रायगडमधील घटना

राज्यात दारू बंदीसाठी अनेक ग्रामपंचायतींनी जोरदार आवाज उठवत दारुबंदी केली. दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याने राज्य शासनाकडून ही दारूबंदी कायद्याबाबत विचार विनीमय झाला. दारूमुळे अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. दरम्यान दारूमुळे आयुष्याची वाट लागू शकते हे महिती असुनही सुद्धा लोक दारु पिताना दिसतात. रायगड जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. दारू बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याचाच दारू पिल्याने मृत्यू झाला आहे.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याला दारु अतिसेवन करण्याचे व्यसन होते. मागच्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी अति दारु सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

सुट्टीच्या दिवशी रोहित अँड कंपनीची दुबईत मजा मस्ती

भारतीय संघ आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीत दाखल झाला आहे. स्पर्धेत साखळी फेरीतील अजून एक सामना बाकी आहे. तर सुपर फोर फेरीतला पहिला सामना रविवारी होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला तब्बल चार दिवस सुट्टी मिळाली आहे. आणि टीम इंडियातले खेळाडू या सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत. काल दुबईत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह भारतीय संघातल्या इतर खेळाडूंनी भरपूर मजा मस्ती केली. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या खेळाडूंच्या या छोट्या ब्रेकचा व्हिडीओ शेअर केला आहे.

झोका खेळता खेळता फाशी लागली, पहिल्या वर्गातील मुलाचा मामाच्या गावी मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. मामाच्या गावी आलेल्या पहिली इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा मुलगा आपल्या मामाच्या गावी आला होता. याठिकाणी झोका खेळता खेळता फाशी लागून त्याचा दुर्दैवी झाला. पुष्कर सुभाषराव पोटे असे पहिल्या वर्गातील मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ

गौरी, गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायिक घेताना  दिसत आहेत. काही दूरच्या पल्ल्यासाठी बससेवा नाही तर रेल्वेचे टिकीट ऐनवेळी मिळत नसल्याने चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी आता आपला मोर्चा ट्रॅव्हल्सकडे वळवला आहे. या संधीचा फायदा घेत ट्रॅव्हल्स व्यावसायकांनी मनमानी भाव आकारायला सुरूवात केली असून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे.

काँग्रेसचे 9 आमदार भाजपच्या वाटेवर? 

शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. सरकार कोसळण्यासोबतच शिवसेनेला मोठा धक्काही बसला कारण आमदारांसह खासदार, पदाधिकारी अशा अनेकांनी शिवसेनेची साथ सोडली. यापाठोपाठ आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा झटका बसणार असल्याचं समोर येत आहे. काँग्रेसचे नऊ आमदार भाजपाच्या संपर्कात असून लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आज आदित्य ठाकरे मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला आले असताना त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, की आपण आता जर-तर अगर-मगरवर बोलण्यापेक्षा देवाचं दर्शन घेऊ. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिने झाले आहेत. या सरकारला किती गुण द्याल? असा सवालही त्यांना केला गेला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, की ‘मी उत्सवाच्या दिवशी राजकारणावर बोलत नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही’

अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, भाजपमध्ये प्रवेश? चर्चांचा पूर

अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली. भाजपचे पदाधिकारी असलेल्या आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. अशोक चव्हाण यांनीही ही भेट झाल्याचं मान्य केलं आहे, पण या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. आशिष कुलकर्णी यांच्याकडे कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. काँग्रेसचा परवा दिल्लीला मोर्चा आहे, त्यामुळे मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

‘जनाधार नसणाऱ्यांना मुख्यमंत्री केलं, तेच शहाणपणा शिकवतात’, पृथ्वीबाबांवर ‘सुशील’ निशाणा!

काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर महाराष्ट्रातले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते, यावरून आता सुशील कुमार शिंदे यांनी चव्हाणांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. जनाधार नसणाऱ्यांना मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं, तेच आता तुम्ही देणारे कोण? हे विचारत आहेत, असा टोला सुशील कुमार शिंदे यांनी हाणला.

गणेशोत्सवात वरुणराजाचे धुमशान, पुढील काही तासात या ठिकाणी पावसाची तुफान फटकेबाजी

राज्यात गणेशोत्स्वाची धूम आहे. कोरोनामुळे मागील 2 वर्ष गणेशोत्सव नागरिकांना आपल्या मनाप्रमाणे उत्साहात साजरा करता आला नाहीत. मात्र, यावर्षी संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. त्यात आता गणेशोत्सवातही पुन्हा वरुण राजा बरसणार आहे. हवामान खात्याने याबाबतची शक्यता वर्तवली आहे.रायगड, ठाणे, अहमदनगर भागात, तसेच पुणे, नाशिक जवळील मध्यम ते तीव्र मेघगर्जनेचे ढग दिसले. त्यामुळे पुढील 2 ते 3 तासांत या भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच मुंबईसह कोकणातही ढगांचा गडगडाट आहे. त्यामुळे याठिकाणीही पुढील 3-4 तासांत तुफान पावसासह मेघगर्जनेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

दसरा मेळाव्यावरुन ‘महाभारत’, शिवाजी पार्कात कोणाची तोफ धडाडणार?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन आता राजकीय महाभारत रंगताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेनेने काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेचा बंडखोर गट म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. दोघांना शिवाजी पार्क येथील मैदानावरच दसरा मेळावा घ्यायचा आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या पाठोपाठ आता मनसेच्या गोटातही दसरा मेळावा भरवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर महाराष्ट्र सैनिकाच्या नावाने एक पत्र शेअर केलं आहे. या पत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार असा उल्लेख करत दसरा मेळावा घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन पुढच्या काही दिवसांमध्ये राजकीय धूमशान रंगताना दिसणार आहे.

पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी

राज्यातील बैलगाडा शर्यतीला एक प्राचीन परंपरा लाभली आहे. बैलगाडा शर्यत हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे अनेक जण बैलगाडा शर्यतीचे समर्थ करतात. तर दुसरीकडे प्राणीप्रेमी मात्र, या बैलगाडा शर्यतीला विरोध करतात. या बैलगाडा शर्यतीशी संबंधित पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील ग्रामीण भागात लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आंबेगावच्या तहसिलदारांनी मोठा निर्णय घेतला आहे.पुण्याच्या ग्रामीण भागात लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे.

भारताची ताकद वाढणार! शत्रूलाही धडकी भरवणारी ‘INS विक्रांत’ नौदलाच्या ताफ्यात

भारतीय नौदलाची ताकद आजपासून आणखी वाढणार आहे. कारण देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आज, शुक्रवार (2 सप्टेंबर 22) रोजी भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. केरळमधील कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा पार पडला. पण तुम्हाला माहिती आहे का, आयएनएस विक्रांतमध्ये लढाऊ विमानं , शस्त्रास्त्रं वाहून नेण्याचं आणि पुनर्प्राप्त करण्याचं तंत्रज्ञान तर आहेच; शिवाय एक मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल, एक पूल, एक स्वयंपाकघर आणि महिलांसाठी खास केबिनही यामध्ये आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.