“पैसे जपून खर्च करा”, जेफ बेझोस यांचा सल्ला, आर्थिक मंदीचा दिला इशारा
मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा यांच्यासारख्या काही जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे. त्यानंतर अॅमेझॉन ही कंपनीदेखील वेगवेगळ्या विभागांतून तब्बल १० हजार कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. उलाढाल मंदावल्यामुळे तसेच महसुलात घट होत असल्यामुळे कंपन्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच अॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष तसेच जगतील अब्जाधीशांच्या यादीत समावेश असलेले जेफ बेझोस यांनी लोकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. लवकरच आर्थिक मंदी येण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच बेझोस यांनी केले आहे. आपल्या खिशात सध्या पैसे राखून ठेवा. मोठ्या वस्तुंची घरेदी करण्याचे टाळा, असे बेझोस म्हणाले आहेत.
“…म्हणून न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं मोठं वक्तव्य
देशातील अनेक जिल्हा सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत जामीन न मिळाल्यामुळे आरोपी तुरुंगात खितपत पडले आहेत. यावरती देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लक्ष्य केले जाण्याच्या भीतीने न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात, असं मोठे विधान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आहे.बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. “जामीन देण्यासाठी अनेक न्यायाधीश टाळाटाळ करतात. उच्च न्यायालयात जामिनाची प्रकरणे प्रलंबित पडली आहेत. न्यायाधीशांना गुन्ह्याची पार्श्वभूमी माहिती नसते, असं नाही. पण, लक्ष्य केले जाण्याच्या भीतीने न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करत आहेत,” असं वक्तव्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आहे.
मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदर रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू
खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू झाल्याची माहिती पंजाब पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये रिंडा सामील होता. रिंडाची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या केल्याचा दावा दविंदर भांबिहा या गुन्हेगारी टोळीने सोशल मीडियावर केला आहे. मे महिन्यात पंजाब पोलीस गुप्तचर मुख्यालयावर ‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड’ (आरपीजी) हल्ला आणि लुधियाना न्यायालयात झालेल्या स्फोटात हरविंदर सिंह रिंडा हा मुख्य सूत्रधार होता.
सोलापुरात ठाकरे गटाकडून कोश्यारींविरुद्ध घोषणा!
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श होते, असं विधान केलं. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केली. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.याच पार्श्वभूमीवर सोलापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राज्यपालांच्या प्रतिमेला काळं फासत “राज्यपालाला पकडा… राज्यपालाला पकडा” अशा घोषणाही देण्यात आल्या.
आनंदाची बातमी! मुकेश अंबानींची मुलगी ईशाने दिला जुळ्या बाळांना जन्म, नावंही ठरली!
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. अंबानी आणि पिरामल कुटुंबियांनी संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करत संदर्भात माहिती दिली आहे. तसेच या बाळांची नावं ठेवण्यात आली असल्याचेही या परिपत्रकातून सांगण्यात आले आहे.“आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, शनिवारी ( १९ नोव्हेंबर रोजी) आमची मुलगी ईशाने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. मुलीचे नाव अदिया आणि तर मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले”, अशी माहिती या परिपत्रकातून देण्यात आली आहे.
रामजन्मभूमीचा ५०० वर्षांचा इतिहास मोठ्या पडद्यावर अवतरणार
गेल्या काही महिन्यात अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक घटनांवर आधारित प्रदर्शित झाले. त्यापैकी अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. लवकरच रामायणावर आधारित ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगत असतानाच आता अयोध्येच्या राम मंदिरावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे.गेली अनेक वर्ष अयोध्या येथील राम मंदिर हा विषय चांगला चर्चेत आहे. तिथे आता राम मंदिर बनवण्याचं काम सुरू आहे. हे मंदिर लवकरच बनून पूर्ण होणार असतानाच रामजन्मभूमीचा पाचशे वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे.
सूर्यकुमारचे वादळी शतक! टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ६५ धावांनी दणदणीत विजय
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना रविवारी (दि. २० नोव्हेंबर) रोजी माऊंट माऊंगनुई येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. त्याला सामनीवीर म्हणून गौरवण्यात आले. यासह भारताने या मालिकेत १-०ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा अक्षरश: घाम काढला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने धडाकेबाज शतकी खेळी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. धावांचा पाठलाग करताना १८.५ षटकात न्यूझीलंड केवळ १२६ धावाच करू शकली.
SD Social Media
9850 60 3590