आज दि.१९ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बसुम गोविल यांचं निधन; हृदयविकाराच्या झटक्यानं गेला जीव

बॉलिवूडमध्ये सातत्यानं कलाकारांच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यानंतर कलाकारांना हृदयविकाराचे झटके येत असल्याचं दिसत आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री तब्बसुम गोविल यांनाही हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बसुम या 78 वर्षांच्या होत्या. कार्डिएक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामायण या प्रसिद्ध मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांच्या या वहिनी होत्या. म्हणजेच त्यांचा भाऊ विजय गोविल यांच्या पत्नी.

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांना कोश्यारींवर संभाजीराजे संतापले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कोश्यारींना महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असून नवीन आदर्श हे नितीन गडकरींसारख्या व्यक्ती आहेत अशा अर्थाचं विधान कोश्यारींनी आज जाहीर कार्यक्रमात केलं. आता सर्वच स्तरामधून या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच संभाजीराजे छत्रपतींनी थेट राज्यपालांना राज्याबाहेर पाठवण्याची मागणी केलीय.

ठाकरे गटाला धक्का; शर्मिला येवलेसह युवती सेनेच्या ३६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारबरोबर घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने, राज्यात नव्याने सरकार स्थापन केले. या घटनेला जवळपास चार महिन्याचा कालावधी होत आला आहे. या कालावधीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळील अनेक शिवसैनिक शिंदे गटात सहभागी झाले आहेत.त्याच दरम्यान आज पुण्यात युवती सेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह ३६ युवती पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत राजकारणामुळे आम्ही राजीनामा देत असल्याच पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे. मात्र, आम्ही पक्षाचे कार्यकर्ती म्हणून काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच वेळी युवती सेनेकडून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नाशकातील गोदावरी नदीवर दररोज निनादणार महाआरतीचे सूर, पाच कोटींचा निधी मंजूर

अयोध्येतील शरयू नदीच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर आता नाशकातील गोदावरी नदीची महाआरती केली जाणार आहे. रोज संध्याकाळी ही महाआरती होईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या महापूजेसाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी दिला जाणार आहे. शिवाय ११ पुजाऱ्यांची नेमणूकदेखील केली जाणार आहे.

दहा दिवसांपासून शेकडो मेंढ्यांचा कळप सर्कलमध्येच फिरतोय, नेमकं काय घडलंय?

चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासून संपूर्ण जगभरातील नागरिकांच्या नजरा चीनकडे लागल्या आहेत. चीनमध्ये घडणाऱ्या बारीक सारीक गोष्टींकडे जगभरातील लोक गांभीर्याने पाहत आहेत. चीनमधील व्हायरल झालेले व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी धुमाकूळ घालतात. कारण चीन देशात विचित्र घटना घडत असल्याने अनेकांच्या भुवया नेहमी उंचावतात. असाच चीनमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शेकडोंच्या संख्येत असलेल्या मेंढ्या मागील दहा दिवसांपासून घड्याळाप्रमाणे गोलाकार फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा काय प्रकार आहे, मेंढ्यांना काही आजार झाला आहे का? चमत्कार आहे का? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.

शेकडो मेंढ्या एकाच सर्कलमध्ये गोल फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या दहा दिवसांपासून मेढ्यांनी सुरु केलेला हा धक्कादायक प्रकार चीन देशातील आहे. मेंढ्यांच्या या गोलाकार फिरण्यामागे कोणतं रहस्य दडलं आहे, याचा थांगपत्ता लागलेला नाही. अनेकांना याबाबत प्रश्न पडले असून त्यांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. उत्तर चीन प्रांतातील मोंगोलियात शेकडो मेंढ्या दहा दिवसांपासून सर्कल करून फिरत आहेत. या विचित्र प्रकाराबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. थंडीपासून त्या मेंढ्या स्वत:ला सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतील, असं एका युजरने कमेंट करुन म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, ते एलियन्स आहेत.

कसमुंडा हादरलं! मोठा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीती

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. देशात वाढत्या साधनसामुग्रीच्या मागणीमुळं कोळशाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. त्यामुळे डोंगरभागातील खाणींमधून कोळसा काढण्याचं काम वेगात सुरु आहे. अशातच कोरबा जिल्ह्याच्या कुसमुंडाच्या खाणीत कोळसा काढण्याआधीच मोठा स्फोट झाला आहे.

हा स्फोटाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा स्फोट इतका भीषण आहे की, खाणीतील धुळीचे लोळ आकाशात जमा झाले आहेत. कुसमुंडाच्या कोळसा खाणीत झालेल्या स्फोटाचा व्हिडीओ पाहून नागरिकांमध्ये भातीचं वातावरण पसरलं आहे. खाणीजवळ असलेल्या गावांमध्ये राहणारे लोक सतर्क झाले आहेत. दरम्यान, या स्फोटात खूप मोठ्या प्रमाणावर दारुगोळ्याचा वापर करण्यात आला आहे.

पेरुमध्ये धावपट्टीवर विमानाची ट्रकला धडक, दोघांचा मृत्यू

पेरूची राजधानी लिमामध्ये विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या ‘लताम’ एअरलाइन्सच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. धावपट्टीवरील अग्निशमन दलाच्या एका ट्रकला विमानाची धडक बसल्याची थरारक दृष्य समोर आली आहेत. या धडकेनंतर लागलेल्या आगीत विमान जळून खाक झालं आहे. या दूर्घटनेतून विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी बचावले आहेत. मात्र, दोन अग्निशमन दलाच्या जवानांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

श्रद्धा-आफताबची Toxic लव्हस्टोरी लवकरच मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं नावंही ठरलं!

सध्या देशभरामध्ये चर्चा असलेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  श्रद्धा वालकर आणि तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाला यांच्यातील प्रेमकथा आणि त्याचा अत्यंत हिंसक पद्धतीने झालेला शेवट मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. मनिष सिंह या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

वेल डन मनिका! आशियाई चषक टेबल टेनिसमध्ये पदक जिंकत इतिहास रचणारी ठरली पहिली महिला

भारताची स्टार टेबल टेनिस महिला खेळाडू मनिका बत्राने इतिहास रचला आहे. वास्तविक, बत्राने आशियाई चषक टेबल टेनिस २०२२ मध्ये कांस्यपदक पटकावले आहे. हे पदक जिंकण्यासोबतच तिने इतिहास रचला आहे. आशियाई चषक टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत तिने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकाची टेबल टेनिसपटू हिना हयातचा ४-२ असा पराभव केला.

फुटबॉल विश्वचषकासाठी जाणाऱ्या ‘या’ संघाला चक्क एफ१६ फायटर जेटने दिली सुरक्षा

कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून २२वा फुटबॉल विश्वचषक सुरू होत आहे. या स्पर्धेत जगभरातून ३२ संघ सहभागी होणार आहेत. संघ कतारला पोहोचत आहेत. दरम्यान, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जेव्हा पोलिश संघ विश्वचषकासाठी कतारला गेला तेव्हा त्याला एफ१६ लढाऊ विमानांनी एस्कॉर्ट केले.

एकीकडे कतारमध्ये फुटबॉलचा मेगा फेस्टिव्हल होणार आहे आणि दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे अनेक फुटबॉल चाहते निराश झाले आहेत. युक्रेन विश्वचषकासाठी पात्र ठरले नाही. त्याचबरोबर रशियावर बंदी घालण्यात आली आहे. या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पोलंडवरही होतो. त्याच्या सीमा दोन्ही देशांना जोडलेल्या आहेत. पोलंड-युक्रेन सीमेजवळ नुकतेच क्षेपणास्त्र पडल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याची परिस्थिती पाहता पोलंडने राष्ट्रीय संघाला एफ१६ लढाऊ विमाने उपलब्ध करून दिली. पोलंड राष्ट्रीय संघाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.