शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. राज्यात कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.
शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षी मोठय़ा उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक यासाठी उपस्थितीत असतात. पण सलग दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. त्यामुळे यंदाही सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेनेचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, जनजागृतीचे कार्यक्रम आणि अन्य समाजोपयोगी उपक्रम ठिकठिकाणी राबवले जाणार आहेत.
तसेच शिवसेनेची प्रत्येक शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयात निवडक शिवसैनिकांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता भगवा ध्वज फडकवण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात यावी. मात्र शिवसैनिकांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून वर्धापन दिन साजरा करावा, अशी सूचना शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे