राहुल गांधी यांचा आज वाढदिवस, काँग्रेस राज्यात संकल्प दिन साजरा करणार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उद्या शनिवारी काँग्रेस राज्यात संकल्प दिन साजरा करणार आहे. उद्या राज्यातील सर्व गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपावर आंदोलन करतानाच 2024मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा संकल्पही केला जाणार आहे. तशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. राहुल गांधी यांचा 19 जून रोजी वाढदिवस असून हा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता गोरगरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप केले जाईल. तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची माहिती पटोले यांनी दिली.

मागील दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या कोरोनाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुल गांधींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन राहुल गांधींचा वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहेस असं त्यांनी सांगितलं.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते व पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात उद्या शनिवारी आंदोलन करणार आहेत. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या दरवाढीविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत. युवक काँग्रेस/एनएसयुआयचे कार्यकर्ते यावेळी बेरोजगारीविरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतील. देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून 2024 मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेसच्यावतीने पटोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असलेल्या ‘आरजी किट’चे वाटप करण्यात आले. गांधी भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे. आमदार कुणाल पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते. आरजी किट वाटपाचा हा कार्यक्रम एनएसयुआयचे संदीप पांडे यांनी आयोजित केला होता.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे उद्या प्रदेश काँग्रेसच्या दादर येथील नूतनीकरण केलेल्या टिळक भवन या मुख्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते व मंत्री उपस्थित राहणार आहेत. यानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे. माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनिल देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.